Saturday, December 14, 2013

Oli halad aani Aale Lonache (ओली हळद आणि आल्याचे लोणचे)

थंडी सुरु झाली की बाजारात ओली हळद यायला लागते. आलंही छान मिळत.
नेहमीच्या लोणच्यापेक्षा काहीतरी वेगळ लोणचं, जे आरोग्यासही चांगले आहे. मग नक्की करून बघा.


Read this recipe in English.....click here.

साहित्य:
  • ओली हळद , बारीक चिरून- १  १/२ कप 
  • आले, बारीक चिरून- १ कप 
  • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- १/२ कप 
  • मीठ- ४ टीस्पून किंवा चवीनुसार 
  • लिंब- ३ ते ४
  • मेथी दाणे- ८ ते १० दाणे 
  • मोहोरी- १/२  कप 
  • तेल- १ कप किंवा  गरजेनुसार 
  • हिंग- १ टीस्पून



कृती: 
  • मी काही वेळा हळद व आंबे हळद अश्या दोन प्रकारची हळद वापरून सुद्धा हे लोणचे केले आहे. आंबे हळदीने छान आंबट चव येते, पण चाखून पाहावी लागते आधी कारण आंबे हळद कधीकधी कडू असते. 
  • मोहोरी मंद आचेवर भाजून घ्यावी. करपवू नये अन्यथा कडवट होते. खलबत्त्यात कुटून घ्यावी. खलबत्ता नसेल तर मिक्सरवर भरड दळावी. 
  • ओली हळद व आले स्वच्छ धुवून सोलावे, कोरडी करून चिरून घ्यावे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. 
  • एका वाडग्यात चिरलेली हळद, चिरलेले आले, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस व मीठ असे सर्व एकत्र करावे. छान मिक्स करावे. रात्रभर किंव्हा ५-६ तास तसेच ठेवावे. 
  • दुसऱ्या दिवशी त्यात कुटलेली मोहोरी टाकून मिक्स करावे. 
  • कढल्यात १ टेबलस्पून गरम करून त्यात मेथी दाणे परतून घ्यावेत. गॅस बंद करून हिंग टाकावी. हिंग फुलला पाहिजे. हि फोडणी लोणच्यावर ओतून  छान मिक्स करावे. 
  • स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
  • छोट्या पातेल्यात तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. तेल पूर्ण थंड झाल्यावर लोणच्याच्या बरणीत ओतून खाली-वर हलवावे.  
  •  लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) हे लोणचे मुरायला जरा जास्त वेळ लागतो. अंदाजे १ ते दीड महिना लागेल, नाहीतर कडू लागत. 

टीपा :
  • हळद व आले सोलून किसून घेतली तरी चालते. मग मिरच्याही अगदी बारीकच चिराव्यात. 
  • मी तयार केलेले हे लोणचे फार तिखट नाही. कारण मला हळदीचा व आल्याचा खरा स्वाद अनुभवायाचा होता. पण ज्यांना तिखट आवडत असेल तर त्यांनी मिरच्यांचे प्रमाण वाढवायला हरकत नाही.  
  • तुम्हाला जर लोणच्यात जास्त तेल आवडत नसेल तर लोणचे मुरल्यावर वरचे तेल बारीक (चहासाठी वापरतो ती) प्लास्टिकच्या गाळणीने गाळुन काढावे. पण मग हे लोणचे फ्रीझमध्येच ठेवावे लागेल. (हे तेल आचारी प्रकारच्या भाज्या बनवण्यास वापरू शकता.) 
  • आपल्या नेहमीच्या मीठाऐवजी सेन्देलोण (सैन्धव मीठ ) वापरू शकता. 
  • मी २५० ग्रॅम ओली हळद आणली होती. साले काढल्यावर व खराब झालेला भाग काढून टाकल्यावर मला १ १/२ कप हळदीचे तुकडे मिळाले. कदाचित तुम्हाला यापेक्षा जास्त किंव्हा कमी चांगले तुकडे मिळू शकतात, तुम्हाला कशी हळद मिळते यावर ते अवलंबून आहे. 

Monday, December 2, 2013

पुदिना- कोथिंबीर चटणी (टिक्का आणि कबाब स्पेशल)

ह्या प्रकारची पुदिना चटणी स्पेशली तंदुरी पदार्थ जसे टिक्का आणि कबाब बरोबर दिली जाते, मग ते शाकाहारी असोत किंव्हा मांसाहारी.  पण तुम्ही ही चटणी कश्याबरोबरही खाऊ शकता.



Read this recipe in English.......... click here.

साहित्य:
ताजी पुदिना पाने- ३/४ ते १ कप 
ताजी कोथिंबीर- १/२ कप 
कांदा,चिरून - १/४ कप 
हिरव्या मिरच्या - २
दही- १ टेबलस्पून 
साखर- चिमुटभर  
सैंधव किंव्हा साधे मीठ- चवीप्रमाणे 

कृती:
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये छान  बारीक वाटून घ्यावं.  चटणी तयार ….
गरमागरम पनीर किंव्हा चिकन टिक्का किंव्हा तंदुरी चिकनचा आस्वाद  ह्या चटकदार चटणीसोबत. 

Beetachi Pachedi बीटाची कोशिंबीर (बीटाची पचेडी )

बीटाचे गुणधर्म जेवढे चांगले आहेत तेवढाच बीट खायला अतिशय कंटाळवाण वाटत. लहान मुल तर त्या कडे पाहायला ही तयार नसतात. मी सुद्धा कच्च बीट या पचेडीच्यायोगेच खाऊ शकते कारण खरच ही पचेडी खूपच छान लागते.  


Read this recipe in English........ click here!

साहित्य:

  • बीट - १ मध्यम आकाराचे
  • दही- १ कप (किंव्हा कमी-जास्त तुमच्या आवडीप्रमाणे)
  • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून - २
  • चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
  • दाण्याचा कुट - १/४ कप
  • साखर- चिमुटभर
  • मीठ- चवीप्रमाणे

कृती:

  • बीट  साले काढून  किसून घ्यावे.
  • एका बाउलमध्ये वरील  एकत्र करावे. बीटाची कोशिंबीर (बीटाची पचेडी ) तयार………
  • पण जेवायला वेळ असेल तर दही आणि दाण्याचा कुट आधीपासून घालू नये.



    टीपा :
    • याप्रमाणे गजर, मुळा, काकडी व केळ यांची कोशिंबीर (पचेडी )  करता येते.
    • पण काकडीची पचेडी करणार असाल तर काकडी किसून घेऊ नये.  काकडी कोचावी.
    • आणि अर्थातच केळ किसून न घेता त्याचे छोटे तुकडे करावेत, हि केळ्याची कोशिंबीर जास्त वेळ ठेऊ नये. 

    Friday, November 29, 2013

    Mugache Ladu (मुगाचे पौष्टीक लाडू)

    साधारणपणे मुगाचे लाडू हे नेहमीच्या (साल काढलेल्या ) डाळीच्या पीठापासून बनवले जातात.  परंतु मी (खरतरं माझ्या सासूबाईंनी) इथे थोडा बदल केला आहे. सालवाली मुगाची डाळ आणि इतर साहित्य वापरून  हे लाडू अधिक पौष्टीक  बनवले आहेत.  

    हे लाडू उपवासाला पण चालतात. थंडीच्या दिवसांत भरपूर उष्मांक देतात. शिवाय गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रीयांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत. 


    साहित्य:
    • सालवाली मुगाची डाळ- २५० ग्रॅम 
    • पिठीसाखर- १०० ते १२५ ग्रॅम (तुम्हांला कितपत गोड आवडत त्याप्रमाणात )
    • साजूक तूप- १२५ ग्रॅम 
    • बदाम पूड- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
    • खारीक पूड-  १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
    • डिंक- २ टेबलस्पून 
    • काळ्या मनुका- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
    • जायफळ पूड- १/२ टीस्पून 
    • वेलची पूड- १ टीस्पून 

    कृती :

    • सालवाली मुगाची डाळ खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरवर दळावी. 
    • डिंक थोड्याश्या तूपात फुलवून (तळून ) घ्यावा. मिक्सरवर जाडसर दळून घ्यावा. 
    • पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून, ती चाळून घ्यावी.
    • एका जाड  बुडाच्या भांड्यात/कढईत किंव्हा नॉन-स्टिक प्यानमध्ये गरजेप्रमाणे तूप घेऊन  मुगाचे पीठ खमंग वास येईपर्यंत मध्यम  ते मंद आचेवर (  जसे बेसन लाडू साठी बेसन भाजतो तसे ) भाजावे.  सतत हलवावे अन्यथा खालून जळण्याची भिती असते.
    • थंड झाल्यावर चवीप्रमाणे पिठीसाखर  इतर सर्व पदार्थ त्यात मिसळून लाडू बांधावेत.
    टीप: साखर वापरायची नसेल तर मेथीच्या लाडूला जसा आपण गुळाचा पाक करतो तसा करून भाजलेले मुगाचे पीठ व इतर सर्व साहित्य पिठीसाखर वगळून त्यात घालून लाडू वळावेत. यात तूप कमी वापरले तरी चालते.  

    Tuesday, November 12, 2013

    Dudhi Parathe (दुधीचे पराठे)

    दुधीची भाजी म्हटलं की अनेक जणांची नाके मुरडतात. पण दुधी सारखी पौष्टिक भाजी नाही. माझ्या मुलांना आणि त्यांच्या बाबांना सुध्दा ही भाजी  आवडत नाही. मग काय अशी हार  मानायची का? म्हणूनच त्यासाठी पराठ्यांचा पर्याय एकदम योग्य आहे. पौष्टिक आणि रुचकर असे हे पराठे ………….



    साहित्य:
    दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा (साधारण किसल्यावर २ १/२ कप)
    कणिक (गव्हाचे पीठ)- ३ कप 
    बेसन- ४ टीस्पून 
    हळद- १/२ टीस्पून 
    हिंग- १/४ टीस्पून 
    तीळ - २ टीस्पून 
    हिरव्या  मिरचीचा ठेचा किंव्हा लाल मिरची पूड- २ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
    जिरे पूड किव्हा खरडलेलं जिरे - १ टीस्पून 
    आले-लसूण वाटण (पेस्ट)- २ टीस्पून 
    चिरलेली कोथिंबीर- १/४ कप 
    मीठ- चवीप्रमाणे 
    मळण्यासाठी तेल-  २ टेबलस्पून 
    भाजण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार  



    कृती:

    दुधी भोपळा बियांसकट किसून घ्यावा. त्याला सुटलेले पाणी फेकून देऊ नये, त्यामुळे जीवनसत्वे नष्ट होतात. 
    एका  काचेच्या बाउलमध्ये  कीस , आले-लसूण वाटण, बेसन, हळद, हिंग घेऊन ते ३ मिनिटे मायक्रो-व्हेव करावे. 
    किंव्हा प्यांमध्ये २ टीस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण वाटण, बेसन, हळद, हिंग  परतून दुधी चा कीस ३-४ मिनिटे  शिजवावा. नंतर बेसन घालून ढवळून ग्यास बंद करावा.

    मिश्रण थंड झाल्यावर त्यात तीळ, मिरची पूड किव्हा ठेचा, कोथिंबीर व मीठ टाकावे.  छान एकत्र करून त्यात कणिक घालावे. जरूर वाटल्यास आणखी कणिक घालावयास हरकत नाही. पाणी अजिबात वापरू नये. तेल टाकून कणिक माळून घ्यावे. त्याचे सारख्या  बनवावे. 

    लाटताना प्लास्टीक पेपर घेतल्यास पीठ  लागते, त्यामुळे भाजताना सुद्धा कमी तेल लागते. शिवाय पराठा लाटणे  जाते. 

    तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे तेल लाऊन पराठे भाजून घ्यावेत. 
    हे पराठे कच्च्या टोमाटोची चटणी, छुंदा, दही, चटणी, केचप किंव्हा  लोणचे ….  कश्याबारोबरही  छान लागतात.   






    Monday, November 11, 2013

    Padavalachya Biyanchi Chutney (पडवळाच्या बियांची चटणी)

    आपण नेहमी पडवळाची भाजी करताना त्याच्या बीया फेकून देतो. पण  दक्षिण भारतात  त्यापासून चटणी बनवतात. मी त्यात थोडे बदल करून हि चटणी बनवली आहे. इडली-डोश्या बरोबर नेहमीच्या चटणीला बदल म्हणून ही चटणी चांगली वाटते.



    साहित्य:
    पडवळाच्या बीया आतील लगद्यसह - १/२ कप 
    हिरव्या मिरच्या - २ ते ३
    राई - १/२ टीस्पून 
    जीरे - १/४ टीस्पून 
    मेथीदाणे - २ ते ३
    हळद- १/४ टीस्पून 
    हिंग- चिमुटभर 
    तेल- १ टेबलस्पून 
    चिंच- एका गोटी एवढी (किंव्हा २ टीस्पून  कोळ )
    गूळ, चिरलेला- १ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
    चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून 
    मीठ- चवीप्रमाणे 

    कृती:
    एका प्यानमध्ये तेल  करून राई घालावी, तडतडली की मिरच्या, जीरे, हळद, हिंग  करावी.  त्यात बीया व लगदा आणि मीठ टाकून मंद आचेवर ३-४  परतून घ्यावा घ्यावा. थंड होऊ द्यावा. 

    वरील मिश्रण, चिंचेचा कोळ, गुळ आणि कोथिंबीर घालून वाटून घ्यावा ……… चटणी तयार.  


    Saturday, November 2, 2013

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी फराळ

    लक्ष दिव्यांनी उजळल्या दाही दिशा, घेऊन नवी उमेद नवीन आशा 
    हि दिवाळी आणि येणारे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवारास सुखाची जावो हीच सदिच्छा!
    तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!




      दिवाळी फराळ: (पाककृती वाचण्यासाठी पाककृतीच्या नावावर क्लिक करा.)  


    Tuesday, October 29, 2013

    Besan Ladu (बेसन लाडू)

    दिवाळीत तर करायलाच पाहिजेत असे बेसन लाडू ...........पण लांबच्या प्रवासात सोबत न्यायला सुद्धा उत्तम.
      

    Read this recipe in English....... click here.

    साहित्य:
    • चणाडाळ - ५०० ग्रॅम
    • साजूक तूप- २५० मिली  
    • पिठी साखर - ३५० ते ३७५ ग्रॅम (आवडीप्रमाणे थोडी कमी-जास्त वापरावी.)
    • वेलचीपूड- २ टीस्पून 
    • बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे- आवडीनुसार (साधारण अर्धा कप)

    कृती:
    • डाळ अगदी २-३ मिनिट जराशी गरम करावी. (दमटपणा घालवण्यासाठी डाळ नुसती गरम करायची आहे, भाजायची नाही. सणसणीत उन्हात तापवली तरी चालेल.)  
    • गिरणीतून दळून आणावी. 
    •  बेसन तूपामध्ये मंद ते मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. भाजताना सारखे ढवळत राहावे. नाहीतर खालून करपेल. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि काही वेळाने पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये. मंद ते  मध्यम आचेवरच भाजावे, नाहीतर  नुसता रंगच बदलेल पण बेसन कच्चेच राहील. 
    • बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. (पिवळ्या रंगाचे लाडू कच्चट लागतात.) 
    • बेसन पूर्ण गार होवू द्यावे. 
    • पिठीसाखर चाळून आणि गुठळी मोडून घ्यावी. 
    • नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार पिठीसाखर घालावी. पिठीसाखर एकदम न घालता चव  घेत थोडी-थोडी अंदाजाने टाकत जावी. आपल्याला किती गोड आवडते त्याप्रमाणे थोडी कमी-जास्त करावी.  
    • नीट एकत्र मळून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.
    • साजूक  वापरल्याने लाडू फार चविष्ट होतात पण मऊ होतात,  ठेवले कि एकमेकांना चिकटतात. वाढतेवेळी पुन्हा वळून द्यावेत.

    सुचना: 
    • जेव्हा तुम्ही साजूक तूप वापरता , तेव्हा २५० ग्रॅम मधले साधारण अर्धी वाटी बाजूला काढून ठेवावे. कारण लाडू जास्त मऊ  होतात.
    • बाजारात मिळणारे साजूक तूप बहुधा २५० मिली म्हणजे २२६ ग्रॅम असते. तेवढे सगळे तूप वापरले तरी चालेल.   
    • पण वनस्पती तूप (डालडा) वापरणार असाल तर पूर्ण २५० ग्रॅम वापरावे. पण शक्यतो साजूक तुपच वापरावे. लाडू चविष्ट होतात आणि तोंडात विरघळतात.
    • किंव्हा १०० ग्रॅम डालडा + १५० ग्रॅम साजूक तूप असे प्रमाण घ्यावे.
    • कधीही भाजलेले  बेसन गरम असताना त्यात पिठी साखर घालू नये. आणि एकदा का बेसन मध्ये पिठी साखर घातली की ते मिश्रण कधीही गरम करू नये. यामुळे पिठी साखरेचे गोळे/गुठळ्या  तयार होऊन लाडू बिघडतात.      
    • घाई नसेल तर आदल्या दिवशी बेसन भाजून आणि पिठी साखर वै. टाकून मळून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिश्रण थोडे चाखून बघावे. गोड कमी असेल तर अजून पिठी साखर लाडू वळावे. यामागचे कारण असे की बेसनात साखर मुरते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लाडू अगोड लागतात. साखरेचे प्रमाण अगदी योग्य हवे असेल तर लाडू दुसऱ्या वळावेत.       


    शेवटी काय तर …. संयम आणि तासंतास न कंटाळता, सावधपणे  बेसन भाजणे यातच चविष्ट बेसन लाडूचे गुपित दडले आहे. 

    Thursday, October 24, 2013

    Masalebhat (मसालेभात)

    लग्नासारखे शुभ समारंभ असले कि  मसालेभात हा हवाच. कोशिंबीर, चटणी, पापड, पुरी-भाजी, भजी, जिलेबी आणि मठ्ठा … या शिवाय बेत अपुरा आहे नाही !



    Read this recipe in English.......click here.

    साहित्य:
    बासमती किंव्हा आंबेमोहर तांदूळ - १ १/२ कप  (उत्तम प्रतीचा जुना तांदूळ वापरावा, कोलम पण चालेल.)
    मटार - १/२ कप
    फ्लॉवरचे तुरे- १/२ कप
    तोंडली,  चिरून - १/४ कप
    वांग, उभ चिरून- १/४ कप
    गाजर, सोलून आणि तुकडे करून- १/४ कप
    फरसबी- तुकडे करून- १/४ कप
    भिजवलेले शेंगदाणे- १/४ कप
    काजू तुकडा- १/४ कप
    मनुका- १ टेबलस्पून
    राई/ मोहरी- १ टीस्पून
    हिंग- १/४ टीस्पून
    हळद- १/२ टीस्पून
    कडीपत्ता- १ डहाळी
    तेल- ३ ते ४ टेबलस्पून
    गरम पाणी- ३ ते ३ १/४ कप
    मीठ चवीनुसार
    बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
    खवलेले ओले खोबरे- १/२ कप
    साजूक तूप- जरुरीनुसार

    काळा मसाला-
    खिसलेले  सुके खोबरे - १ टेबलस्पून
    तीळ - १ टेबलस्पून
    लवंग- ४
    जीरे - २ टीस्पून
    मसाला वेलची- २
    दालचीनी- २ इंचाचे तुकडे
    सुक्या लाल  मिरच्या - ३ ते  ४

    (वरील सर्व जिन्नस थोड्याश्या तेलावर खमंग भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये दळून घ्यावेत. मिरची ब्याडगी वापरली आहे. जर काळा मसाला करायला वेळ नसेल तर १ ते १ १/२ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गोडा मसाला  वापरावा, चवीत फारसा फरक पडत नाही. मी सुद्धा बहुधा असाच वापरते. )

    कृती:
    तांदूळ आणि सर्व भाज्या धुउन  बाजूला ठेवाव्यात.
    एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी. ती तडतडली की काजू, कडीपत्ता, हळद, हिंग टाकावा. सर्व भाज्या, शेंगदाणे, मनुका टाकून मिनिटभर परतून घ्याव्यात. नंतर त्यात तांदूळ, काळा मसाला आणि मीठ टाकून छान एकत्र करून जरा वेळ परतून घ्यावे. नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन मंद आचेवर भात शिजवावा.  मधेमधे हलक्या हाताने भात हलवावा.
    हा भात प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येतो.
    वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबर आणि थोडस तूप टाकावे. गरमागरम भात मठ्ठ्या बरोबर वाढावा .


    Monday, October 21, 2013

    मठ्ठा

    लग्नासारखे शुभ समारंभ असले कि मठ्ठा हा हवाच.  मसालेभात, कोशिंबीर, चटणी, पापड, पुरी-भाजी, भजी, जिलेबी आणि मठ्ठा … या शिवाय बेत अपुरा आहे नाही ! मग एवढ तुडुंब जेवल्यावर ते जिरवायला मठ्ठा हा हवाच.



    साहित्य:
    ताक - ३ कप 
    आल्याचा ठेचा- १/२ टीस्पून 
    हिरवी मिरची, बारीक कापून किंव्हा खरडून- १ ते २
    कोथिंबीर - १ टेबलस्पून 
    जीरे पूड- १/२ टीस्पून 
    मीरे पूड- १/४ टीस्पून 
    साखर- १ टीस्पून 
    सैंधव (सैंधव आणि पादेलोण एकत्र) किंव्हा साधं मीठ - चवीप्रमाणे 

    कृती:
    सर्व एकत्र करून रवीने चांगले घुसळून घ्या. थंडगार करून मग प्या. 
    हल्ली खारी बुंदी टाकायची पद्धत आली आहे , छान  लागते. 
    जिरे पूड व सैंधव च्या एवजी चाट  मसाला किंव्हा  जलजीरा मसाला  छान  चव येते. 

    Saturday, October 19, 2013

    कायस्थ प्रभू पद्धतीचा गरम मसाला

    अस्सल खव्वये म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सीकेपी (कायस्थ प्रभू) पद्धतीचा हा गरम मसाला आहे. काही अपवाद सोडल्यास हा खास मांसाहारी पदार्थांसाठीच वापरला जातो.    


    Read this recipe in English.......click here.

    साहित्य :

    • धणे- १/४ किलो 
    • त्रिफळ - ५० ग्रॅम
    • खसखस- ५० ग्रॅम
    • शहाजिरे- १० ग्रॅम
    • जायपत्री- १० ग्रॅम
    • नागकेशर- १० ग्रॅम
    • बडीशेप- ५० ग्रॅम
    • लवंग - १० ग्रॅम
    • दालचिनी- १० ग्रॅम
    • काळीमिरी- १० ग्रॅम
    • बाद्यान- १० ग्रॅम
    • जायफळ- १ नग
    • मसाला वेलची - १० ग्रॅम

    कृती:
    हे सर्व जिन्नस मंद आचेवर वेगवेगळे छान वास येईपर्यंत खमंग भाजून घ्यावेत. करपू नयेत. नंतर थंड झाल्यावर मिक्सर वर दळून घ्यावेत.

    मसाला पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात/बरणीत भरून ठेवावा. 

    हा गरम मसाला चिकन, मटण, कोलंबी, खेकडे तसेच अंडा करी साठी एकदम मस्त आहे.
    शिवाय हरभरे, काळे वाटाणे, मसूर च्या आमटीत खूप छान लागतो. सुरणाच्या रस्सा भाजी साठी पण वापरतात.
    ज्या भाज्यांना मटण रस्सासारखी चव हवी असेल त्या साठी हा उत्तम आहे.

    हा मसाला जरा strong आहे, जपून वापरावा.
    ज्यांना हा मसाला जास्तच strong वाटत असेल त्यांनी धन्याचे प्रमाण वाढवावे. पाव किलो एवजी अर्धा किलो घ्यावे.

    Wednesday, October 16, 2013

    मासळी विकत घेतानाची परिक्षा (Fish Test)

    मासळी तर सगळ्यांनाच आवडते पण खरेदी करताना मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. भरपूर मोबदला मोजून घरी आणलेली मासळी चांगली निघेलच याची खात्री नाही. म्हणूनच काही सूचना इथे दिल्या आहेत. ९० % तरी त्या उपयोगास येतील. १० % अर्थातच तुमच नशीब.


    • मासे नेहमी चकचकीत दिसले पाहिजेत. कडक असावेत, कुजका वास नसावा. 
    • माश्याची खवले घट्ट असली तर ते ताजे, खवले सुटायला लागली असतील तर शिळे. 
    • माश्याचे कल्ले लाल भडक असायला हवेत, म्हणजे ते मासे ताजे आहेत. कल्ले काळपट असतील व मासे कापताना कुसकरत असतील तर ते शिळे मासे असतात. बोटांनी दाबले असता बोट आत जाते, ते मासे शिळे असतात. 
    • माशाचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर भाग दिसल्यास मासे ताजे समजावेत. 
    • व काळसर दिसल्यास मासे शिळे व खराब समजावेत. 
    • ज्या कोलंबीची साल पटकन सोलली जातात ती शिळी असते. 
    • पापलेटचे कल्ले दाबले असता कल्ल्यातून पांढरे पाणी आले पाहिजे. लाल पाणी आले तर पापलेट शिळे आहे. पापलेटचा चंदेरी थर हाताला लागत असेल तर, ते पापलेट शिळे आहे. तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो. 
    • खेकडे विकत घेताना ते जिवंत, चालणारे व काळसर रंगाचे असले पाहिजेत. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खाण्यायोग्य मासं त्यात मिळत नाही. 
    • अमावस्येच्या आसपासच्या दिवसांत मिळणारे खेकडे जास्त चविष्ट व मांसाने भरलेले असतात. 
    • शिंपल्याचा खूप कुजकट घाण वास येत असेल तर त्या शिळ्या असतात. ज्या कच्च्या असताना अजिबात उघडत नाहीत, त्या ताज्या असतात. ज्या उकडल्यावर उघडत नाहीत त्या खराब असतात. 
    • ओला जवळा घेताना पांढरा स्वच्छ रंगाचा ताजा घ्यावा. 
    • तांबूस सफेद रंगाची व घट्ट सालीची करंदी ताजी असते. 
    • कापलेला घोळ माश्याचा तुकडा लालसर गुलाबी असायला हवा, पांढरट- पिवळट नको. 
    • बोंबीलाचे तोंड लालसर असायला हवे, म्हणजे ते ताजे. पांढरट, पिवळट आणि लीबलीबित पडलेले बोंबील शिळे असतात. 
    • बांगडे शिळे व खराब झाल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो. काळसर रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात. 
    • भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा विकत घेण्यापूर्वी घट्ट बघून घ्यावे. लिबलिबीत नको.  
    • पांढऱ्या स्वच्छ, घट्ट व चमकदार दिसणाऱ्या मुडदुशा (रेणव्या) ताज्या असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या कि त्याना पिवळसर रंग येतो व त्या मऊ पडतात. 
    • पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट व तोंडाच्या आतील भाग लाल असलेली मांदेली ताजी असतात. मांदेली शिळी व खराब होऊ लागली कि तिला नारंगी रंग येऊ लागतो व त्या मऊ पडतात. 
    • काळसर चमकदार रंगाची व घट्ट बोय ताजी असते. जास्त मोठी बोय चवीला उग्र असते व हिरमुस वास असतो. 
    • कालवे घेताना पाढऱ्या रंगाची, मोठी व ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत. शिळी कालवे त्याच्या पाण्यात विरघळायला लागतात, त्या पाण्याचा रंग पांढरट दिसतो व त्या पाण्याला वास येतो. छोटी कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात. 
    • आपण कितीही काळजी घेतली तरी मासे विकणारे काही लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. पापलेट ताज दिसावं म्हणजेच कल्ल्यातून पांढरे पाणी याव म्हणून कल्ल्यात कालव भरतात. बोंबील लालसर दिसण्यासाठी त्याला लाल रंग चोळतात. शिळ्या माश्याच्या कल्ल्याला व कापलेल्या तुकड्यांना दुसऱ्या माश्यांचे रक्त लावतात, जेणे करून ते मासे ताजे दिसावेत. त्यामुळे सावधान राहाण गरजेचं आहे. शक्यतो ओळखीच्या व खात्रीच्या विक्रेत्याकडूनच मासे विकत घ्यावेत. अनेकदा रंगरूप सारखे असणारे दुसरे बनावट मासे आपल्या नेहमीच्या माश्याऐवजी विकतात.

    माहितीचा स्त्रोत: आजी, आई, पप्पा आणि नचिकेत घरत.       

    Saturday, October 12, 2013

    Lal Bhopalyache Bharit (लाल भोपळ्याचे भरीत)

    ब्राम्हणी पद्धतीच रुचकर अस हे भरीत. लाल भोपळा 'अ' जीवनसत्वाने भरपूर, खूप पौष्टिक आहे. गर्भारपणात भरपूर लाल भोपळा खावा. या भरीतातील काही पदार्थ वगळलेत तर उपवासाला चालेल. आमच्या शेजारी दातार आजी राहायच्या. त्यांनी माझ्या आईला हे भरीत करायला शिकवल. हे भरीत केल की नेहमी त्यांची  येते. 


    Read this recipe in English..... Click here.

    साहित्य:
    • लाल भोपळा- २५० ग्रॅम
    • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- ४ ते ५
    • कोथिंबीर, बारीक चिरून- १/४ कप
    • तेल- २ टेबलस्पून
    • मोहरी - १ टीस्पून
    • हळद- १/२ टीस्पून
    • हिंग- १/४ टीस्पून
    • दही- १/२ कप
    • साखर- चवीनुसार
    • मीठ- चवीनुसार 

    कृती:
    • लाल भोपळ्याच्या साल काढून छोट्या फोडी/तुकडे करून घ्यावेत.  
    • भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये भांड्यात (डाळ आणि भाताच्या भांड्यावर ठेवल्या तरी चालतील) थोडेसे पाणी शिंपडून उकडून घ्याव्यात. 
    • चमच्याने मॅश करून घ्याव्यात. (उकडल्यावर भोपळ्यात जे पाणी असेल ते घेऊ नये पण टाकुही नये. आमटीसाठी/वरणासाठी वापरावे. त्यात जीवनसत्व असतात. )
    • थंड झाल्यावर मिरच्या आणि कोथिंबीर घालून निट मिक्स करावे.
    • कढल्यात/फोडणी पात्रात तेल गरम करावे. मोहरी आणि हळद, हिंग घालून फोडणी करून उकडलेल्या भोपळ्यात घालावी. लगेच झाकण ठेवावे. थोडावेळ झाकण तसेच ठेवून फोडणी त्यात मुरु द्यावी.   
    • जेवायच्या वेळेला दही घालावे. चवीनुसार मीठ आणि किंचीत साखर घालावी. छान मिक्स करावे. 

    हे भरीत उपवासासाठी करायचे असेल तर …….
    • फोडणीत हळद, हिंग, मोहोरी घालू नये त्याएवजी जीरे वापरावे. 
    • तेलाएवजी तूप वापरले तरी चालेल. 
    • भरीतात वरून शेंगदाण्याचा कूट घातल्यास छान वेगळी चव येते.
    • कोथिंबीर तुमच्याकडे उपासाला चालत असेल तर घाला.  

    Saturday, September 21, 2013

    क्रंची लेट्युस सलाड

    लेट्युस, रंगीत सिमला मिरच्या आणि छानस ड्रेसिंग यांचा मेळ जमला की सलाड छानच लागत.....


    Read this recipe in English......click here!

    साहित्य :
    लेट्युस , तुकडे करून - १ कप
    कांदा, चौकोनी तुकडे- १/२ कप
    पिवळी सिमला मिरची, चौकोनी तुकडे- १/२ कप
    लाल सिमला मिरची,चौकोनी तुकडे - १/४ कप
    हिरवी सिमला मिरची,चौकोनी तुकडे - १/४ कप
    काकडी, चौकोनी तुकडे - १/२ कप
    काळे ऑलिव - ४

    ड्रेसिंग :
    लिंबू रस - १ टेबलस्पून 
    ऑलिव ओईल - २ टीस्पून
    बाल्सामिक विनेगर - १ टीस्पून
    मीर पूड व मीठ चवीप्रमाणे 


    कृती:
    सर्व भाज्या धुउन कापून घ्याव्यात. लेट्युस कपू नये, हाताने तुकडे करावे. वापरायच्या आधी लेट्युस बर्फाच्या पाण्यात ठेवावे, म्हणजे छान कुरकुरीत होते. 
    वरील सर्व भाज्या आणि ड्रेसिंग एकत्र करावे.  
    गार्लिक ब्रेड बरोबर सर्व करावे. 
    कुठल्याही ग्रील किंव्हा तंदूर डीश बरोबर उत्तम. 

    Thursday, September 19, 2013

    Paneer Noodles (पनीर नूडल्स)

    पनीर आणि नूडल्स या दोन्ही आपल्या आवडीच्या गोष्टी. मग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर आहा! काय धमाल येईल ना? मग वाचा अशीच एक धमाकेदार पाककृती....... 




    Read this recipe in English ....

    साहित्य:
    उकडलेल्या हक्का नूडल्स - १ पाकीट (२०० ग्रॅम )
    पनीर , चौकोनी कापून  - १५० ग्रॅम
    तेल - ४ टेबलस्पून
    चिली गार्लिक सॉस किंव्हा पेस्ट किंव्हा सांबल - २ ते ३ टेबलस्पून
    लिंबाचा रस-१ टीस्पून
    सोय सॉस - २ टेबलस्पून
    टोमाटो  केचप- १ टेबलस्पून
    स्वीट बीन सॉस - १ टेबलस्पून  (ऎच्छिक)
    मीरी पूड - १/४ टीस्पून
    सिमला मिरची, उभी चिरून - १ १/२ कप
    कांदा, उभा चिरून - १  १/२ कप
    चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
    मीठ चवीप्रमाणे



    कृती:
    एका पँन मध्ये थोडेसे तेल आणि  चिली गार्लिक सॉस किंव्हा पेस्ट टाकून परतून घ्या. त्यात पनीरचे तुकडे घालून जर परतून घ्या. आणि एका डीश मध्ये काढून बाजूला ठेवा.
    उरलेले तेल, कांदा, सिमला मिरची, सगळे सॉस, मिरी पूड  आणि मीठ टाकून मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
    त्यात नूडल्स टाकून टॉस करा, २-३ मिनिटे परतून घ्या. आता पनीरचे परतलेले तुकडे टाका. छान एकत्र करून,  २-३ मिनिटे परतून घ्या. वरून कोथिंबीर भुरभुरा.
    लगेचच गरमागरम वाढा आणि गरमागरम खा .

    पनीर एवजी टोफू वापरू शकता. तिखट जास्त हव असेल तर जास्त  असेल तर भाज्या परतताना १/२ टीस्पून मिरची पूड घाला.

    Tuesday, September 17, 2013

    Beet-Khobare Vadi/Barfi (बीट आणि खोबऱ्याच्या वड्या / बर्फी)



    खोबऱ्याच्या वड्यांना बीटाची पुण्याई........ अहो म्हणजे चवीत बदल आणि बीट पण पोटात जाईल.   


    Read this recipe in English..........

    साहित्य :
    किसलेले बीट , - १/२ कप
    खवलेले ओलं खोबरे - १ कप  (कपात खोबरे हाताने दाबून भरून घ्यावे )
    साखर - १ १/४ कप
    वेलची पूड- १ टीस्पून किंव्हा रोझ  इसेंस - २ ते ३ थेब
    सायीसकट दुध- १ कप
    साजूक तूप- १ टेबलस्पून + १ टीस्पून


    कृती:
    बीट  स्वच्छ धुऊन आणि सोलून घ्यावे. किसणीवर किसून घ्यावे. 
    खोबरे खवल्यावर  फक्त पांढरा भागच घ्यावा.
    जाड बुडाचे  नॉन- स्टिक भांडे घेऊन त्यात १ टेबलस्पून तूप गरम करावे, लगेच त्यात  बीटच कीस घालून ५-७ मिनिटे मऊ होईपर्यंत परतावा.
    नंतर त्यात खवलेले खोबरे, साखर, दुध घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. सतत ढवळावे. आच मध्यम ठेवावी. प्रथम मिश्रण पातळ होईल पण नंतर घट्ट होऊ लागेल.
    ताटाला तूप लाऊन तयार ठेवावे.  मिश्रणात वेलची पूड घालावी व सतत ढवळावे. मिश्रण हळूहळू भांड्याच्या लागेल व कोरडे होऊ लागेल.
    भांडे ग्यास वरून उतरावे व लगेच तूप लावलेल्या ताटात मिश्रण काढून वाटीच्या मागच्या भागाने पसरावे व दाबावे.
    गरम असतानाच सुरीने वड्या  पाडाव्यात.
    थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. ८ दिवसापेक्षा जास्त ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.


    Sunday, September 8, 2013

    उकडीचे मोदक

    बाप्पाचे आणि आपल्या सर्वांचे आवडते - उकडीचे मोदक. गणपती बाप्पा मोरया !



    साहित्य :
    सारण (चव) :
    • खवलेल ओलं खोबर -१ १/२ कप (साधारण २ मध्यम आकाराचे नारळ, फक्त पांढरा भाग घ्यावा )
    • चिरलेला गूळ- १ १/४ कप
    • वेलची पूड- १ टीस्पून
    • भाजलेली खसखस- १ टीस्पून (ऐच्छिक - मी वापरत नाही)
    • साजूक तूप- १ टीस्पून 
    उकड :
    • मोदकाचे तांदूळ पीठ- १ १/२ कप (जाडे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे व दळून आणावे किंव्हा बाजारात तयार सुध्द्धा मिळते.)
    • पाणी- १ १/२ कप
    • मीठ- चिमुटभर
    • तेल- १ टीस्पून

    कृती :
    • जाड बुडाच्या पातेल्यात किंव्हा नॉन-स्टिक पॅनमध्ये खवलेल ओलं खोबर, गूळ, तूप एकत्र करून मध्यम ते मंद आचेवर १५ मिनिटे शिजववे. सतत हलवत रहावे , करपणार नाही याची काळजी घ्यावी. रंग बदलला आणि घट्ट होऊ लागले कि वेलची पूड टाकून, व्यवस्थित ढवळून गॅस बंद करावा. जास्त शिजवू नये, चिक्कीसारखे घट्ट होईल. याप्रमाणे सारण आधीच तयार करून ठेवावे.
    • पाणी उकळत ठेवावे.पातेल्यातील पाण्याला उकळी आल्यावर त्यात तेल व मीठ घालावे. नंतर पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी. तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्यावी. जास्त गरम असताना वाटीच्या साह्याने गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यातली थोडी उकड ताटात काढून हाताला थोडे तेल व पाणी लावून मळावी. छान, मऊ, एकजीव उकड तयार करावी. उकड ओल्या कपड्याने कपड्याने झाकून ठेवावी.  
    • नंतर त्याचा मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारख्या आकाराची पारी करावी. त्यात सारण भरावे व मोदकाचा आकार द्यावा. तयार मोदक सुध्दा ओल्या कपड्याने कपड्याने झाकून ठेवावेत. नाहीतर सुकून तडे जातात.
    • असे ७-८ मोदक झाले की मोदकपात्रातील चाळणीवर कपड्याचा तुकडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालून त्यावर ठेवून १५-२० मिनिटे वाफवावे. किंव्हा कुकरला शिट्टी न लावता सुध्द्धा वाफवता येतात.
    गणपतीबाप्पाचा नैवेद्य तयार ………पण मोदकावर ताव कोण मारणार ? बाप्पा बिचारा वासाचा धनी.  

    Saturday, August 24, 2013

    Mugdal Khichadi (मुगडाळ खिचडी)

    आजारी असताना, विशेषकरून  ताप आला असेल किंव्हा पोट बिघडलं असेल. जेवण करायचा कंटाळा आला असेल किंव्हा खूप थकवा आला असेल अश्या वेळी पटकन होणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे हि खिचडी. लहान मुलांना सुद्धा भरवण्यासाठी एकदम उत्तम.


    साहित्य: 
     तांदुळ- १/२  कप
     मूग डाळ- १/४ कप
    जीरे- १ टीस्पून
    काळी मिरी- २ ते ४ (ऐच्छिक )
    हिंग- १/४ टीस्पून
    हळद- १/२ टीस्पून
    मीठ चवीनुसार
    पाणी- ३ ते ४ कप (मी इथे ३ कप वापरले आहे, ज्याप्रमाणात खिचडी पातळ व मऊ हवी आहे तसे वापरावे )
    साजूक तूप - १ टीस्पून + वरून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार 
    कृती:
    डाळ-तांदूळ स्वच्छ धुउन, आवश्यक पाण्यात भिजत ठेवावेत. पाणी मोजून घेतल्यास तेच पाणी खिचडी बनवताना वापरता येते.

    कुकरमध्ये तूप गरम करून मिरी व जीरे जरासे परतावे.  मग हिंग, डाळ-तांदुळ, पाणी, हळद व मीठ टाकावे आणि कूकर बंद करून गॅसवर ठेवावा.
    ३-४ शिट्टया  झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि कूकरला ८-१० मिनीट बंद ठेवावा. कुकर उघडल्यावर रवीने थोडेसे खिचडीला घाटावे. आजारी माणसाना व लहान मुलांना खायला सोपे जाते.  गुजराती पद्धतीत खिचडीला अस थोडं घाटल जाते. आवडत नसेल तर नाही घाटले तरी चालेल.

    खिचडी फार पातळ व मऊ नको असेल तर फक्त १ १/२ कप पाणी वापरावे.


    ही गरमागरम खिचडी भरपूर तूप घालून लोणचे किंवा लिंबाच्या फोडीसोबत सोबत खावी. जोडीला कढी आणि पापड असेल तर सोने पे सुहागा ! काय ?

    Tuesday, August 20, 2013

    Gulbahar Rasgulla (गुलबहार रसगुल्ला)

    माझ्या कल्पकतेतून साकारलेले हे गुलबहार रसगुल्ले उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट डेसर्ट आहे. आपल्या आयुर्वेदानुसार गुलकंद हे शरीरातील उष्णतेला कमी करत. मोठयांपासून छोट्यांपर्यंत आवडणारे रसगुल्ले गुलाबाच्या मोहक रंगात, एकदा करून पहाच.



    Read this recipe in English...........click here.

    साहित्य:
    गाईचे दूध- १ लिटर
    सफेद विनेगर- २ टेबलस्पून 
     साखर- १ १/२ कप 
    पाणी- ३ कप 
    रोझ इसेंस- १/२ टीस्पून 
    रासबेरी रेड फूड कलर- १ चिमुटभर 
    गुलकंद- २ ते ३ टीस्पून 
    गुलाबाच्या पाकळ्या-  सजावटीसाठी 


    कृतीः
    दुध मंद आचेवर उकळवावे, उकळी आली की विनेगर टाकुन त्यास हलवत रहावे. त्यामुळे ते फाटेल. एका चाळणीवर स्वच्छ सुती कपडा पसरून ठेवा आणि गॅस वरून भांडे उतरउन लगेच त्या कपड्यावर ओतावे आणि त्याची घट्ट गठली बांधून, पिळून अतिरिक्त पाणी काढुन टाकावे. चाळणीतच किमान १५ मिनिटे तसेच ठेऊन द्यावे. 
    नंतर त्यात रंग मिसळावा व चांगल्या तर्‍हेने हाताच्या तळव्याचा वापर करून मळावे. छेना (पनीर) जोपर्यंत मऊ, मलाईदार आणि सर्व गुठळ्या मोडेपर्यंत मळावे. 
    नंतर त्याचे सारखे भाग करून गोळे करवे. साधारण १५ होतील. गुलकंदचे पण छोटे गोळे बनवावे. पनीरची परी करून गुलकंदची गोळी मध्ये भरून पुन्हा गोळे वळून घ्यावेत
    पाण्यातरोझ इसेंस व साखर मिळवावी. उकळवे, उकळ आला कि लगेच त्यात गोळे हळुच त्यात टाकुन ५ मिनीटे मोठ्या आचेवर उकळवावे. आता रसगुल्ले तरंगायला लागतील. त्यानंतर झाकण ठेऊन अजून ५ मिनीटे मोठ्या आचेवर उकळवावे. रसगुल्ले तयार ……. 
    रसगुल्ले काढुन गुलाब पाकळ्यांनी सजउन थंड करावे, नंतर वाढावे.

    टीप:
    • रसगुल्ले साखरेच्या पाकात उकळल्यावर आकाराने दुप्पट होतात. म्हणून रसगुल्ले बनवताना आकाराचे भान ठेवा. शिवाय त्यानुसार उकळण्यासाठी मोठे भांडे घ्या.
    • छेना तुम्ही जेवढं जास्त वेळ मळाल तेवढे रसगुल्ले हलके आणि स्पॉन्जी बनतील. 
    • साखरेचा पाक गुलाबजाम प्रमाणे घट्ट बनवू नये. 

    Saturday, August 17, 2013

    नारळाची हिरवी चटणी

    ही महाराष्ट्रीयन पद्धतीची मस्त रुचकर चटणी कशाबरोबरही छान लागते.


    Read this recipe in English..........

    साहित्य :
    खवलेलं ओल खोबर - १ ते १ १/४ कप (मध्यम आकाराचा नारळ )
    लसूण- ६ पाकळ्या
    कोथिंबीर - १ छोटी जुडी
    हिरव्या मिरच्या- ३ ते ५ (तुमच्या आवडीप्रमाणे )
    कडीपत्ता - ५-६ पाने
    साखर- १/२ टीस्पून
    मीठ- चवीनुसार
    पाणी- १/२ कप

    फोडणीसाठी -
    जिरे किंव्हा मोहरी - १ टीस्पून
    हिंग- १/४ टीस्पून
    तेल- १ टेबलस्पून
    कडीपत्ता - ५-६ पाने

    सगळे साहित्य ताजे  वापरा.

    कृती :
    वरील सर्व साहित्य वाटून घ्या. त्यावर जिरे , हिंग व कडीपत्त्याची फोडणी ओता.
    मोहरीची फोडणी  करायची असेल तर मग जिरे वाटणात घ्या.
    हि चटणी डोसा, इडली मेदुवडा किंव्हा घावन सोबत छान  लागते.

    हि चटणी जर जेवताना किंव्हा  बटाटा-वड्यासोबत द्यायची असेल तर कमीत कमी पाणी घालून वाटा. फोडणी घालू नका.

    आवडत असेल तर  चटणीत छोटा अर्धा लिंबू पिळा.
    किंव्हा १/४ कप दही चटणीत घाला.  पण मग २-३ मिरच्या जास्त घालाव्या लागतील. दह्याचा स्वाद  छान लागतो.
    चटणी वाटताना पाण्याएवजीनारळाचे पाणी वापरले तर एक वेगळी चव मिळेल. 

    Tuesday, August 13, 2013

    Shralyachya / Dodakyachya Salanchi Chuteny/Bhaji (शिराळ्याच्या /दोडक्याच्या सालांची चटणी/भाजी)

    शिराळी किंव्हा दोडके पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. याची साल फार जाड आणि खरखरीत असते. भाजी करताना ती काढून टाकतात. परंतु त्यात भरपूर तंतुता (फायबर ) व लोह असत. त्यामुळे त्याची चटणी/भाजी केली तर त्याचा नक्कीच शरीराला उपयोग होईल.


    Read this recipe in English............


    साहित्य:
    • शिराळी - २५० ग्रॅम (आपल्याला फक्त त्यांच्या सालांचाच उपयोग करायचा आहे )
    • कांदा, चिरून - १ कप / १ मोठा
    • मिरची, कापून - ३ ते ४
    • लसुण , ठेचून - ६ पाकळ्या
    • मोहरी - १ टीस्पून
    • हळद- १/२ टीस्पून
    • हिंग- १/४ टीस्पून
    • मीठ- चवीनुसार
    • तेल- ३ टेबलस्पून
    • खवलेला ओला नारळ- १/४ कप


    कृती:
    • शिराळी स्वच्छ धुवा आणि त्याची साल काढा. खल-बत्ताच्या साह्याने साले कुटा. कुटताना थोडे मीठ टाका म्हणजे पाणी सुटून लवकर कुटले जाईल. 
    • हि कुटलेली चटणी एका बाउल मध्ये काढा. त्यात पाणी टाका आणि नंतर ती चटणी किव्हा ठेचा हाताने घट्ट पिळून घ्या. म्हणजे जास्तीचे मीठ निघून जाईल.
    • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे, लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात हळद, हिंग टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
    • नंतर त्यात पिळलेला ठेचा व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
    • गरज वाटल्यास त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. मध्ये मध्ये भाजी हलवत रहा. 
    • वरून ओलं खोबर पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.




    Saturday, August 10, 2013

    Kanak-Rajgeera Vade (कणक राजगिरा वडे)

    उपवासासाठी एकदम उत्तम ……




    ह्या कंदमुळाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत. कोकणात याला "कणकं" किंव्हा "कणग्या" म्हणतात. अश्या अनेक प्रकारची कंदमुळ थंडी सुरु झाली कि बाजारात दिसू लागतात. आदिवासी लोक विविध प्रकारची कंदमुळे विकायला आणतात. उपवासाला चालणारी हि कंदमुळ उकडून किंव्हा निखाऱ्यावर भाजून चांगली लागतात. बटाटा आणि रताळ्याचे जसे पदार्थ बनवतो तसे याचे पदार्थ बनवायला हवेत. माझी हि प्रायोगिक रेसिपी…


    उकडलेले कणक (सोलुन, किसून किंव्हा कुस्करून), त्यात मावेल एवढे राजागीरा पीठ, चवीप्रमाणे मिरची व जिऱ्याचा ठेचा,शेंगदाणा कूट, मीठ एकत्र करून मळून घ्या. साबुदाणा पिठात घोळून तळा.
    उपवासाच्या चटणी सोबत किंव्हा दह्यासोबत गरम गरम खा.

    वरील पाककृतीसाठी ह्या कंदमुळाऐवजी बटाटा, रताळ, अळकुडी इत्यादी कुठल्याही प्रकारची कंदमुळे वापरता येतील.






    Thursday, August 8, 2013

    Healthy Heart Dumplings (हेल्दी हार्ट ओटस डम्पलिंगस )





    Read this recipe in English...........

    साहित्य:
    • रोल ओटस- १ कप
    • पाणी - ३/४ कप
    • कांदा, बारीक चिरलेला - २ टेबलस्पून
    • आलं, बारीक चिरलेलं - १ टेबलस्पून
    • गाजर, बारीक चिरलेलं - २ टेबलस्पून
    • शिमला मिरची, बारीक चिरलेली  - १ टेबलस्पून
    • मटार - २ टेबलस्पून
    • हिरवी मिरची,बारीक चिरलेली  - ४
    • कोथिम्बिर, बारीक चिरलेली  - २ टेबलस्पून
    • खवलेल ओल खोबर - २ टेबलस्पून (ऐच्छिक )
    • मोहरी- १ टीस्पून
    • हळद- १/२ टीस्पून
    • हिंग- १/४ टीस्पून
    • ऑलिव ओईल किंव्हा कुठलही तेल- ३ टीस्पून
    • मीठ- चवीप्रमाणे


    कृती :
    • एका प्यान मध्ये तेल गरम करा. मोहरी टाका, तडतडल्यावर  त्यात मिरची, कांदा आणि आल टाका. हळद आणि हिंग टाकून जरासं परता.  त्यात राहिलेल्या भाज्या आणि मीठ टाकून १-२ मिनिट परता. पाणी टाका आणि उकळी येऊ द्या.
    • त्यात ओटस टाका आणि व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. झाकण ठेऊन १ मिनिट वाफ काढा. मिश्रण खूप कोरडे वाटत असेल तर किंचित पाणी शिंपडा.
    • पण एक लक्ष्यात ठेवा कि पाण्याचे प्रमाण हे ओटस पेक्षा कमीच असले पाहिजे अन्यथा मिश्रण चिकट बनेल.
    • नंतर त्यात कोथिंबीर आणि खोबर टाकून व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. मिश्रण थंड होऊ द्या .
    • त्या मिश्रणाचे सारखे गोळे करून इडली पात्रात  किंव्हा मोदक पात्रात ४ ते ५ मिनिट वाफवा. मायक्रोवेव्ह ओवन मध्ये पण करू शकता.
    • टोमाटो केचप किंव्हा कुठल्याही चटणीसोबत गरमागरम वाढा. 


    Sunday, August 4, 2013

    कोकणी मटन रस्सा

    सर्व मांसाहारी लोकांना आवडेल असा रस्सेदार, झणझणीत, रुचकर  मटन रस्सा. भात, भाकरी, वडे , आंबोळी किंव्हा पाव कश्याही सोबत उत्तम. बस ओरपा ……. 



    साहित्य:
    मटण - १ किलो
    बटाटे- २ मध्यम आकाराचे 
    आल-लसुण पेस्ट - ४ टीस्पून 
    कांदा, चिरुन- १ मोठा 
    हळद- १ टीस्पून 
    हिंग- १/२ टीस्पून 
    घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला - ५ ते ८ टीस्पून  (आवडीनूसार कमी जास्त वापरा, मी ६ टीस्पून वापरला आहे ) 
    तेल- ६ टे.स्पून 
    दालचिनी- २ इंचाचा तुकडा 
    काळी मिरी - ६
    तमालपत्र- ६
    मीठ - चवीनुसार 

    वाटण-
    तेल- २ टीस्पून 
    खवलेल ओल  खोबर - ३/४ कप ते १ कप 
    कांदा, चिरुन- १/४ कप 
    लवंगा- ३
    जिरे- १/२ टीस्पून 
    मसाला वेलची- १

    धणे- १/२ टीस्पून 
    बडीशेप- १/२ टीस्पून 
    खसखस- १/२ टीस्पून 
    काळी मिरी- २
    बाद्यान - १
    जायपत्री- १ छोटी 
    कोथिंबिर- १/४ कप किंव्हा मुठभर 
    हिरवी मिरची- १ किंव्हा २

    तेलावर सर्व खडे मसाले आणि कांदा टाकून १ मिनिट परतवा. त्यात खोबर टाकून खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिरची, कोथिंबीर आणि थोड पाणी टाकून बारीक वाटून घ्या.



    कृती:
    मटण स्वच्छ धुउन आणि कापून घ्या. मटणाला 
    हळद, हिंग, आल-लसूण पेस्ट आणि मीठ लाऊन व्यवस्थित चोळा. कमीतकमी अर्धा तास मुरत ठेवा. 

    कढई मध्ये तेल गरम करुन त्यात कांदा आणि वर दिलेले खडे गरम मसाले गुलाबी होइस तो पर्यंत परता. 

    आता मटन घालुन चांगले ५ मिनिटे मोठ्या आचेवर खमंग परता. 

    त्यात पाणी व एका बटाट्याचे दोन तुकडे या प्रमाणे तुकडे करून टाका. झाकणावर पाणी ठेऊन मध्यम आचेवर १५- २० मिनिटे शिजू द्या. 

    मग मसाला आणि वाटण टाकून व्यवस्थित हलून घ्या. ४५ ते ६० मिनिट मंद आचेवर झाकण लाऊन शिजवुन घ्या.
    मधेमधे हलवत रहा.  हा रस्सा पातळ असतो तेव्हा जरुरीनुसार गरम पाणी टाका. झाकानावरचे टाकले तरी चालेल. ४-५ मिनिटे अजुन शिजवा. चव घेऊन मिठाचे प्रमाण पहा. 

    गरमागरम भात, भाकरी, आंबोळी किंव्हा वड्यासोबत वाढा. 


    हे मटन कुकरमध्ये पण शिजवता येईल. पण बाहेर केलेल्या मटणाची चव काही न्यारीच असते. 
    ह्या पद्धतीने कोंबडी पण शिजवता येईल. पण लक्ष्यात ठेवा, कोंबडी शिजायला कमी वेळ लागतो. 











    Friday, August 2, 2013

    कोकणी वडे (कोंबडी वडे / मालवणी वडे )

    तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे आमच्या कोकणाची जान आहे. कोंबडीची सागुती/रस्सा आणि हे वडे हि कॉम्बो डीश "कोंबडी वडे " म्हणून प्रसिध्द आहे.

    हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे "मालवणी वडे " म्हणून पण ओळखले जातात. हे वडे कोंबडीचा रस्सा, मटणाचा रस्सा किंव्हा काळ्या वाटण्याचा रस्सा यासोबत खाल्ले जातात. तुम्हाला एक गम्मत सांगू का ………चहसोबत पण मस्त लागतात. आणि करता करतानाच किती संपतात.


    Read this recipe in English..........click here.


    पूर्वतयारी-(वड्यासाठी पीठ बनवणे ):
    साहित्य:

    • जाडा तांदूळ-१ किलो
    • चणा डाळ - १०० ग्रॅम
    • उडीद डाळ - ५० ग्रॅम
    • धणे - १ टेबलस्पून
    • जीरे -  १ टेबलस्पून
    • बडीशेप-  १ टेबलस्पून
    • मेथी दाणे - १/२ टीस्पून


    कृती:
    तांदूळ स्वच्छ  धुवा. निथळून सुती कापडावर पसरऊन वाळउन घ्या. डाळी व इतर पदार्थ धुउन घ्यायची गरज नाही. तांदूळ धुतल्यामुळे वडे मऊ व हलके होतात.
    पण पावसामुळे किंव्हा घाई असेल तर तांदूळ नाही धुतले तरी चालतील.
    वरील सर्व पदार्थ एकत्र करून गिरणीतून भरड दळून आणावे. पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. खरतरं जेंव्हा वडे  करायचे असतील तेंव्हाच पीठ दळून आणावे. ताज्या पिठाचेच वाडे चांगले लागतात.

    जर तुम्ही परदेशात राहत असाल किंव्हा तुमच्या आसपास गिरणी नसेल तर सुद्धा काही पर्याय आहेत. त्यांचा जरूर वापर करा.
    १. सर्व पीठ आणि धने पूड वै. सर्व बाजारात उपलब्ध असतात. ते सर्व एकत्र करून वापरता येइल.
    २. २ कप तांदळाचे पीठ, अर्धा कप बेसन आणि ६ उडदाचे पापड भिजऊन वाटून पीठ भिजवता  येईल.
    ३. उडदाची डाळ, मेथी दाणे, बडीशेप हे किमान २ तास भिजवायचे आणि आलं-लसूण-कांदा-मिरची  सोबत वाटून तांदळाचे पीठ, बेसन यात एकत्र करून पीठ मळता येईल.

    आता पाहू या पाककृतीचा मुख्य भाग…… 
    साहित्य:

    • वड्याच पीठ - ३ कप
    • कांदा- १ मोठा
    • हिरवी मिरची- २ ते ३
    • कोथिंबीर - मुठभर
    • आलं - १/२ इंच
    • लसूण - ५ ते ६ पाकळ्या
    • हळद- १/२ टीस्पून
    • मीठ- चवीनुसार (मीठ जपून घाला, लक्षात ठेवा की हे वडे रश्यासोबत खायचे आहेत.)  
    • तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार 


    कृती:

    • कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची हे  सगळ वाटून घ्या. (काही लोकं आल- मिरची वै. वापरत नाहीत पण कांदा जरूर घालावा. कांद्यामुळे चांगली चव येतेच शिवाय पीठ आंबून येण्यास मदत होते.)
    • एका परातीत वड्याचे पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या. (पीठ घट्टच मळायला हवे, आंबवल्यावर ते सैल होते.) 
    • रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवा.
    • सकाळी पीठ फुगून येईल. छान मऊ  झालेलं असेल.
    • एक भिजलेला सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या. तेल गरम करून मध्यम आचेवर वडे  व्यवस्थित तळून घ्या. वडे  छान  फुगतात. (पीठ खूपच मऊ होऊन वडे थापता येत नसतील तर थोडे सुके पीठ घालुन मळून घ्या.)  
    • काही लोक वडे पिवळे दिसायला हवेत म्हणून व्यवस्थित तळत नाहीत, पण असे वडे कच्चट लागतात .
    • मग वाट कसली पाहताय ……… हे गरमागरम वडे गरम झणझणीत कोंबडीच्या किंवा मटणाच्या रश्यासोबत वाढा. शाकाहारी लोकांनी अजिबात निराश व्हायला नको, काळ्या वाटाण्याच्या किंवा हरभऱ्याच्या रश्यासोबत वडे खा.  



    पाककृती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

    कोंबडी रस्सा: http://marathifoodfunda.blogspot.in/2014/07/malwani-kombadi-rassa.html

    मटण रस्सा: http://marathifoodfunda.blogspot.in/2013/08/blog-post_3.html