Friday, September 25, 2015

Aluche Fatfate (अळूची पातळ भाजी किंवा अळूचे फतफते/फदफदे)

अळूची पातळ भाजी किंवा अळूचे फतफते/फदफदे योग्य प्रकारे बनवली तर खूपच रुचकर लागते. काहीजण फतफत्याला नाकं मुरडतात पण ज्यांना आवडते, त्यांच्यासाठी फतफते म्हणजे तृप्तीची परमावधी असते. काही ठिकाणी फतफते लग्न किंवा श्राद्धाला करण्याची पद्धत आहे.आळूची भाजी खरतरं वर्षभर मिळते पण पावसाळ्यात मिळणारी अळूची भाजी चवीला जास्त चांगली असते. अळूमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच भरपूर प्रथिनेही असतात.

अळूचे फतफते वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी इथे माझ्या आईची सोप्पी रेसिपी देते आहे. फारसे साहित्य न वापरूनही हि अशी भाजी छान लागते. माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल.
Read this recipe in English. Click here.


सूचना:
  • अळूच्या अनेक प्रजाती आहेत. पण त्या सर्व खाण्यायोग्य नाहीत. काही रानटी प्रजाती विषारी आणि अतिशय खाजऱ्या असतात. त्यामुळे खरेदी करताना काळजी घ्या. रानात किंवा ओसाड जागी उगवलेले अज्ञात अळू आणू नका. 
  • अळू हाताळण्यापूर्वी हातावर तेल चोळा. देठातून एक प्रकारचा रस बाहेर येतो, तो त्वचेला लागल्यास खाज येण्याची शक्यता असते.  
  • काळजीपूर्वक चिरून घ्या. चाळणी आणि चमच्याने मदतीने हात न लावता नळाखाली धुवा. 
  • काही जणांची त्वचा संवेदनशील असते. एवढी काळजी घेतल्यावरही जर खाज येत असेल तर हातावर लिंबाचा रस चोळून हात धुवा. जास्त खाज येत असेल तर हातावर तुरटी किंवा तूप चोळा.
  • एवढ्या सगळ्या सूचना लिहिल्या आहेत म्हणून घाबरून जाऊ नका. शिजताना चिंच, तेल आणि मसाले यांच्या वापराने खाजरेपणा नाहीसा होतो. 
  • आणखी एक गोष्ट ... या रसाने कपडेही देखील डागळतात. 

साहित्य:
  • अळू , चिरून- साधारण 3½ कप (4-5 पाने आणि थोडी देठे)
  • हिरव्या मिरच्या, चिरून- 2
  • शेंगदाणे- ½ कप
  • छोट्या लिंबाएवढी चिंच किंवा घट्ट चिंचेचा कोळ- 1 टेबलस्पून किंवा आवडीनुसार
  • गुळ - 2 ते 3 टिस्पून किंवा आवडीनुसार
  • तेल- 2 ते 3 टेबलस्पून
  • मोहरी- 1 टीस्पून 
  • जिरे- 1 टीस्पून 
  • हिंग- ½ टीस्पून 
  • हळद- ½ टीस्पून 
  • मिरची पूड- 1 टीस्पून किंवा आवडीनुसार
  • मीठ- चवीनुसार

कृती:
  • शेंगदाणे किमान 3-4 तास पाण्यात भिजत घाला. मग कुकरला थोडेसे मीठ टाकून शिजवा. 1-2 शिट्ट्या होऊ द्या.
  • हाताला तेल चोळून घ्या. देठावरील बाह्य जाड, कडक भागव दोरे काढून टाका. आतील पांढरा आणि मऊ भाग घ्या.
  • पानांच्या शीरा काढून पाने बारीक चीरा. देठे सुद्धा काळजीपूर्वक बारीक चीरा.
  • काळजीपूर्वक चिरून घ्या. चाळणी आणि चमच्याने मदतीने हात न लावता नळाखाली धुवा.
  • चिंच पाण्यात भिजवून ठेवा व थोड्यावेळाने पिळून कोळ काढून  घ्या.
  • कुकरच्या भांड्यात चिरलेली भाजी टाका. त्यात मिरच्या कापून टाका. थोडे पाणी टाका आणि शिजवा. 2 शिट्ट्या होऊ द्या.
  • पावभाजी मॅशर किंवा रवी किंवा हन्ड ब्लेंडरने गरगट/ मॅश करा.
  • एका कढईत तेल गरम करून मोहोरी टाका आणि ती तडतडली की जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. चमच्याने हलवून घ्या.
  • लगेचच उकडलेले शेंगदाणे घाला आणि मिनिटभर परता.
  • आता त्यात अळूचे मिश्रण घाला. छान ढवळून घ्या.
  • फतफते कितपत पातळ हवे त्या प्रमाणात (साधारण 1 कप) पाणी घाला. आमटीप्रमाणे फार पातळ करू नका 
  • तुम्हाला  कितपत आंबट-गोडं आवडत त्या प्रमाणात चिंचेचा कोळ आणि गुळ घाला. (अंदाज नसेल तर आधी कमीच घाला. चाखून बघा. नंतरही चिंच-गुळ वाढवता येतो. वाढवल्यावर एक उकळी घ्यायची.)  
  • त्यात मीठ आणि आवडत असेल तर 1 टीस्पून गोडा मसाला घाला. छान ढवळून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे शिजू द्या.
  • गरमागरम भातासोबत किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.

टिपा:
  • काही ठिकाणी चणाडाळ भिजवून शेंगदाण्यासोबत उकडून घेवून या भाजीत टाकतात.  
  • हवे असल्यास खोबऱ्याचे काप आणि मुळ्याचे तुकडे फोडणीत शिजवून घेता येतील. 
  • आपल्या आवडीनुसार चिंच आणि गूळ प्रमाण कमीजास्त करू शकता. 
  • या भाजीत गोडा मसाला वापरू शकता.
  • भाजी पातळ करायची असेल किंवा भाजी मिळुन येण्यासाठी बेसन घाला. भाजी शिजली की घोटताना बेसन चाळुन घाला नाहीतर गुठळ्या होतात.   
  • अळू ऐवजी पालक वापरूनही हि भाजी करू शकता.
  • लसणाची चव आवडतं असेल तर कढल्यात जरासं तेल घेवून त्यात 2 टिस्पून लसूण काप तपकिरी होईपर्यंत परता. तयार भाजीवर  हि फोडणी ओतुन झाकून ठेवा.  (अळूच्या भाजीपेक्षा या प्रकारे केलेल्या पालकाच्या पातळ भाजीवर लसणाची फोडणी मस्त लागते.) 

Friday, September 18, 2015

Rushichi Bhaji (ऋषीची भाजी) ~ ऋषि पंचमीची भाजी

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस भाद्रपद शु. पंचमि म्हणजे ऋषिपंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी किंवा मिसळीची भाजी म्हणजेच ऋषीची भाजी.
पण हि आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या भाज्या पिकवण्यासाठी बैलाचे कष्ट (आणि आजच्या युगात यंत्राचे) नकोत. फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरायच्या. या भाजीत फळ भाज्या, पाले भाज्या आणि कंदमुळे अश्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. या भाजीत अजिबात तेल-तूप वापरले जात नाही. शिवाय या भाजीत मिरची पूड आणि कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत, तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. कमी उष्मांक असलेली हि भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवदार आहे. याचे कारण म्हणजे सेंद्रीय, हंगामी आणि ताज्या भाज्यांचा वापर व तेल आणि मसाल्यांचा अभाव.

ऋषी पंचमीचे व्रत किंवा उपवास हा आपल्या सप्तर्षींचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी केले जाते. वशिष्ठ ऋषींची पत्नी देवी अरुंधतीचीही या दिवशी पूजा केली जाते. ऋषीमुनी अत्यंत साधे जीवन जगत असत. रानात मिळणाऱ्या फळ, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एकप्रकारे तत्कालीन ऋषींच्या सात्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक मिळते. शरीरा सोबत आत्म्याची शुद्धता करण्याचे असे हे ऋषी पंचमीचे व्रत आहे. पण हे व्रत फक्त स्त्रियाच करतात, हे काही माझ्या मनाला पटलेले नाही.

माझ्या लहानपणी, माझी आजी हि भाजी चुलीवर मोठ्या मातीच्या भांड्यात बनवायची. फक्त बायकांचाच उपवास असल्याने प्रथम नेहमीचे जेवण आणि नैवेद्य व्हायचा. आजी आणि मोठी काकू मागच्या पडवीत भाज्या सोलत-चिरत बसलेल्या असायच्या. आम्हा मुलांचे आणि पुरुषांचे जेवण एक वाजताच उरकायचे. मग आम्ही सगळी मुलं मागच्या अंगणात डोकावायला जायचो. या बायकांचा हा कुठला खास पदार्थ चाललाय या बाबत कुतुहल असायचं. आजी बोलवायची खायला. पण एकदम लहानपणी भाजीचा रंग आणि त्यातल्या पालेभाज्या बघून पळून जायचो. मग एकदा कधीतरी हि भाजी चाखून बघितली. आणि हळूहळू हि भाजी आवडू लागली. बरेच जणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत त्या भाज्या घातलेली 'ऋषीची भाजी' मात्र आवडते. मीही त्याला अपवाद नाही. आजीच्या त्या मातीच्या भांड्यातील भाजीची चव काय औरचं होती. मी ती चव कधीच विसरू शकत नाही. आणि आज हे तिला सांगायला आजीही नाही आणि मोठी काकूही नाही. ऋषी पंचमीला आजीची आणि काकूची खूप आठवण येते.

Read this recipe in English........click here.


हि भाजी कोकणतल्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी येथे आमची पद्धत देते ​​आहे.

साहित्य:
  • अळूची पाने आणि देठे, सोलुन आणि चिरून- 1 कप
  • लाल भोपळा, सोलुन आणि कापून- ½ कप 
  • माठ, चिरून- ½ कप 
  • कुरडूस, (रानातली पालेभाजी), चिरून- ½ कप (ऐच्छिक)
  • सुरण, सोलुन आणि कापून- ¼ कप (ऐच्छिक)
  • भेंडी, चिरून- ¼ कप
  • श्रावण घेवडा, चिरून- ¼ कप
  • गवार, चिरून- ¼ कप
  • पडवळ, चिरून- ¼ कप
  • शिराळे, सोलुन आणि चिरून- ¼ कप
  • घोसाळे, चिरून- ¼ कप
  • हिरव्या मिरच्या, चिरून- 3 ते 5 किंवा वैयक्तिक आवडीनुसार
  • चिंचेचा कोळ - ½ ते 1 टिस्पून किंवा चवीनुसार
  • खवलेले ओले खोबरे- ¼ कप ते ½ कप /आवडीनुसार
  • खडे मीठ- चवीनुसार

कृती:
  • अळू, कुरडूस आणि माठ स्वच्छ धुवून बारीक चिरा. 
  • अळूचे देठ सोलून घ्या आणि बारीक चिरा. अळूच्या देठांना चिंचेचा कोळ चोळून ठेवा, नंतर धुवून टाका. 
  • लाल भोपळ्याची सालं काढून त्यांचे छोटे तुकडे करा. 
  • सुरणाची सालं काढून त्याचे अगदी छोटे तुकडे करून चिंचेचा कोळ चोळून ठेवा. 
  • शिराळ्याची सालं काढून त्यांचे तुकडे करा. 
  • भेंडी आणि घोसाळे चिरून घ्या. 
  • पडवळाचेही आतल्या बिया काढून तुकडे करा.
  • गवार व घेवडा शीरा काढून मोडून घ्या. 
  • सर्व भाज्या धुवून घ्या. 
  • मिरच्यांचे तुकडे करा. तिखट आवडत असेल तर ठेचा करा. 
  • एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात सर्व चिरलेल्या भाज्या, मिरच्या आणि मीठ असं सर्व एकत्र करा. 
  • पातेल्यावर स्टीलचे ताट ठेवून पाणी ठेवा. मध्यम ते मंद आचेवर भाजी शिजवा. भाजीत जास्तीचे पाणी टाकू नका. शिजताना भाजीला पाणी सुटते. त्यातच भाजी शिजते. वरून पाणी टाकले तर भाजी पांचट लागते.     
  • मधून मधून ढवळत रहा. पण जोरजोराने ढवळू नका नाहीतर भाजीचा लगदा होईल. शिजायला कठीण असणाऱ्या भाज्या बोटाने दाबून बघा. त्या शिजल्या कि भाजी शिजली. 
  • आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ आणि ओले खोबरे घालून एक वाफ काढा. 
  • गरम गरम भाकरी किंवा भातासोबत सोबत वाढा. 

टिपा:
  • ऋषी पंचमीच्या ३-४ दिवस आधी या खास ऋषीच्या भाज्या बाजारात येऊ लागतात.
  • माझ्या माहेरी घरच्या अंगणात उगवणाऱ्या सर्व भाज्या या भाजीसाठी वापरतात, अगदी टोमॅटो सुद्धा.
  • तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी इथे भाज्यांचे प्रमाण दिले आहे. पण प्रत्यक्षात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या प्रमाणात त्या भाज्यांचे प्रमाण कमी-जास्त करावे. 
  • उपलब्धेनुसार वर उल्लेख केलेल्या एक किंवा अधिक भाज्या वगळू शकता. किंवा दुसऱ्या भाज्या वाढवू शकता. 
  • माझ्या सासूबाई भाजी शिजली की वरून थोडेसे घरचे लोणी घालतात. 
  • भोपळा आणि ओले खोबरे या भाजीला गोडवा देतात.
  • रताळे, पांढरा गावरान मका, काकडी, कच्ची केळी, दुधी भोपळा सारख्या इतर पावसाळी/ हंगामी भाज्या पण वापरू शकता. 
  • मका वापरणार असाल तर आधी प्रेशर कुकर मध्ये मीठ टाकून उकडून घ्या. नंतर त्याचे लहान तुकडे करून भाजीत घाला.
  • ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ला जाणारा भात आणि भाकरी यासाठी जे तांदुळ मिळतात ते सुद्धा बैलाचे कष्ट न घेता पिकवलेले असतात. त्या तांदुळाला 'पायनु' असं म्हणतात.    
  • या ताटात दिसणाऱ्या चटणीत फक्त ओले खोबरे आणि मिरची आहे.

Saturday, September 5, 2015

Gopalkala (गोपाळकाला)

जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

खरतरं 'गोपाळकाला' चे दोन अर्थ आहेत. एक आपला उत्साहाने भरलेला सण 'गोविंदा' किंवा 'दहीहंडी' आणि दुसरा म्हणजे जन्माष्टमीला आपल्या लाडक्या बाळकृष्णाला नैवेद्य दाखवून बाळगोपाळांना प्रसाद म्हणून वाटला जातो तो गोपाळकाला .

गोपाळकाला करायला अतिशय सोपा आणि झटपट. शिवाय पौष्टिक आणि रुचकर, पूर्णान्न आहे. फक्त प्रसाद म्हणून न करता इतर दिवशीही संध्याकाळचा हेल्दी नाश्ता म्हणून पण मस्त. 


Read this recipe in English.....click here. 

साहित्य:
  • दही - १ कप
  • पोहे - १ कप
  • लाह्या- एक मूठभर 
  • ओले खोबरे, खवलेले- २ टेबलस्पून 
  • काकडी, चिरून- १ कप
  • डाळिंब दाणे- १/४  कप
  • हिरव्या मिरच्या, चिरून किंवा ठेचून- १ टे 
  • आले, किसून- १/२  चमचा
  • शेंगदाणे, भाजून सोललेले- १/४  कप 
  • तळलेली चणा डाळ किंवा पंढरपूरी डाळं - १/४  कप 
  • मीठ- चवीनुसार 
  • साखर- १ टीस्पून 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- १/४  कप
  • साजुक तुप- १ टीस्पून 
  • जिरे- १ टीस्पून 

कृती:
  • पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवा.  
  • दह्यात साखर आणि थोडेसे मीठ घालून ढवळा.
  • एका मोठ्या वाडग्यात दही, पोहे आणि लाह्या एकत्र करा. ५ मिनिटे भिजू द्या.
  • तेवढ्या वेळात कढल्यात/फोडणी पात्रात तूप गरम करून त्यात जिरे, हिरव्या मिरच्या घाला आणि जरासं परता.
  • हि फोडणी पोहे-दही मिश्रणावर ओता आणि चांगले मिक्स करा.
  • खोबरे, काकडी, डाळिंबाचे दाणे, आले, शेंगदाणे, मसाला चणाडाळ, कोथिंबीर आणि थोडे मीठ घाला. व्यवथित मिक्स करा.
  • नाश्ता म्हणून खाणार असाल तर लगेच खा, कारण थोड्या वेळाने त्यातील दाणे मऊ  पडतात.  

टिपा:
  • लाह्या उपलब्ध नसतील तर नाही वापरल्या तरी चालतील.  
  • तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी साहित्याचे माप दिले आहे. खरतरं ज्याला जे पदार्थ आवडतात ते हव्या त्या प्रमाणात कमी-जास्त वापरा. याला निश्चित असे नाही. कारण हा गोपाळकाला आहे, आणि काला म्हणजे सगळे पदार्थ एकत्र करून केलेला. 
  • तुम्हाला आवडणारी इतरही फळे यात घालू शकता.

बोला श्री गोपाळकृष्ण महाराज की जय .......

Thursday, September 3, 2015

Adai Dosa (अडाई डोसा)

अडाई डोसा पौष्टिक, प्रथिनयुक्त आणि लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता आहे. अडाई डोसा हा 'मिक्स डाळ डोसा' यापेक्षा वेगळा असतो कारण यात डाळीसह तांदूळ सुद्धा वापरतात.


Read this recipe in English.......click here.

साहित्य:
  • जाडा किंवा इडलीचा तांदूळ - 1½ कप
  • चणा डाळ- ½ कप
  • तूर डाळ - ¼ कप
  • उडीद डाळ- ¼ कप
  • मुग डाळ- ¼ कप
  • मसूर डाळ * - ¼ कप (ऐच्छिक)
  • मेथी दाणे * -  ½ टीस्पून (ऐच्छिक)
  • कांदा किंवा मद्रासी छोटे कांदे, चिरून- 1 कप 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर 
  • कढीपत्ता, बारीक चिरून- 2 टेबलस्पून 
  • हिरवी मिरची, बारीक चिरून * - 2 टेबलस्पून (पर्यायी)
  • आले, किसून- 2 टेबलस्पून 
  • ओले खोबरे, खवलेले- 2 टीस्पून 
  • हिंग- ¼ टिस्पून
  • हळद * - ¼ चमचा (ऐच्छिक)
  • लाल सुक्या मिरच्या (ब्याडगी)- 10 (किंवा मिरची पूड- 2 ते 3 टिस्पून)
  • खायचा सोडा- चिमूटभर (ऐच्छिक)
  • मीठ - चवीनुसार
  • तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • तांदूळ आणि सर्व डाळी धुवा. किमान 5 तास किंवा पूर्ण रात्रभर तांदूळ आणि डाळी  वेगवेगळ्या भिजत घाला. मेथी दाणे डाळीतच भिजायला टाका.
  • तांदूळ आणि लाल मिरच्या वाटून एक मोठ्या वाडग्यात काढा.
  • सर्व डाळी एकत्र जराश्या भरडसर वाटाव्या.  
  • वाटलेले तंदुलांनी डाळी एकत्र करा. 2 ते 5 तास पीठ आंबवण्यासाठी ठेवा किंवा वाटल्यावर लगेच डोसे केले तरी चालतात. पण थोड्यावेळ पीठ आंबवले तर डोसे हलके आणि रुचकर होतात.   
  • डोसे करायला घेण्यापूर्वी पीठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं, खोबरं, हळद, हिंग, मीठ आणि बेकिंग सोडा घालावा. ढवळुन मिक्स करावे. पीठ इडली सारखेच असावे. गरज असल्यास पाणी टाका.
  • तवा गरम करून आणि थोडे तेल पसरवा आणि पळीभर पीठ डोसा घाला. डोश्यापेक्षा जाड आणि उत्तप्यापेक्षा पातळ असा डोसा घालावा. 
  • डोश्याच्या बाजूने आणि वरून थोडे तेल सोडवे. मध्यम गॅस वर झाकण ठेवून १-२ मिनिट शिजवावे. मग डोसा पलटून आणि पुन्हा एक मिनिट शिजवावे.
  • टोमॅटो चटणी किंवा नारळाची हिरवी चटणी किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर हे डोसे गरमागरम सर्व्ह करा.

टिपा:
  • * असे चिन्हांकित केलेले साहित्य मुळ पाककृतीत नाहीत, मी चव वाढवण्यासाठी वापरले आहेत. तुम्ही ते वगळले तरी चालेल.
  • डाळ-तांदूळ  वाटल्यावर लगेचच  डोसा करणार असाल तर बेकिंग सोडा वापरा,अन्यथा गरज नाही.  
  • जर चुकून पिठ पातळ झाले, तर बारीक रवा घाला. रवा घातल्यावर किमान अर्धा तास पिठात भिजला पाहिजे.
  • जाड डोसे आवडत नसतील तर पीठात थोडे पाणी घालून पातळ डोसे पण करता येतात.  
  • या डोश्याला 'पूर्णान्न' बनवण्यासाठी पीठात गाजर, कोबी, पातीचा कांदा, सिमला मिरची, पालक, शेवग्याची पाने किंवा शेपू सारख्या भाज्या घाला. चव तर वाढेलच सोबत पौष्टीकताही.