Thursday, June 27, 2013

Maka Pakoda (मक्याची भजी)

पावसाळा  आला की बाजारात मके दिसायला लागतात. मग मके भाजून खायचा कंटाळा आला की अशी मक्याची भजी करून बघा. 


साहित्य :
  • मक्याचे दाणे - १ कप 
  • कापलेला कांदा - १/२ कप 
  • बेसन १/४ कप 
  • तांदुळाचे पीठ- २ टीस्पून 
  • आलं - १ इंचाचा तुकडा 
  • मिरच्या- ३ ते ४ 
  • जिरे पूड- १  टीस्पून 
  • धणे  पूड- १  टीस्पून 
  • हळद- १/२  टीस्पून 
  • हिंग- १/२  टीस्पून 
  • चिरलेली कोथिंबीर - १/४ कप 
  • मीठ चवीनुसार 
  • तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार 

कृती:
  • मक्याचे दाणे , मिरची आणि आल मिक्सरमध्ये पाणी न घालता भरड वाटा. फूड प्रोसेसर वापरलात तर छान भरड निघेल. 
  • वाटलेल्या मिश्रणात कांदा, कोथिंबीर, वरील सर्व मसाले, बेसन,तांदुळाचे पीठ, मीठ आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी टाकून सर्व एकत्र करा. 
  • नेहमीप्रमाणे सर्व भज्या तळुन घ्या. गरमागरम टोमाटो केचप किंवा कुठल्याही चटणीसोबत वाढा. पावसाळ्याची मजा लुटा. 

Sunday, June 16, 2013

Bharangichi Bhaji (भारंगीची भाजी)

भारंगी हि एक रानभाजी आहे. हि भाजी फक्त पावसाळ्यातच बाजारात येते. हि भाजी पोटाच्या विकारांवर अतिशय गुणकारी आहे. आपल्या आयुर्वेदात या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी हि भाजी नक्की खाल्ली पहिजे.



साहित्य:
  • भारंगीची पाने- २ वाटे (चिरून अंदाजे २ कप)
  • वाल किंवा पावटे - १/४ कप 
  • कांदा,चिरून - १ मध्यम आकाराचा 
  • लसूण पाकळ्या, ठेचून - ६ ते ८
  • हळद- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • घरगुती मसाला किंव्हा मिरची पावडर- २ टीस्पून 
  • तेल- ३ ते ५ टेबलस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून (ऐच्छिक )

भारंगीची पाने:

कृती:
  • आदल्या दिवशी रात्री, वाल/पावटे स्वच्छ धूऊन पाण्यात भिजत घालावेत. 
  • प्रथम पाने व्यवस्तीत धुऊन घ्यावीत . फार बारीक चिरू नयेत किंव्हा हाताने तोडून घ्यावीत . 
  • चिरलेली पाने व भिजवलेले वाल एकत्र करून कुकरमध्ये तीन शिट्या काढून उकडून घ्यावेत. 
  • एका पँन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा, लसूण टाकून गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात हळद, हिंग व मसाला टाकून परतून घ्या. मीठ व उकडलेली भाजी पिळून त्यात टाका. भाजी फार घट्ट पिळू नका नाहीतर भाजी खूपच कोरडी होइल. 
  • छान एकत्र करून झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा. 
  • भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत गरमागरम वाढा.
दुसरी पद्धत :
भाजी कापून उकडून घ्या . तेलावर कांदा, लसुन आणि ४-५ लाल सुक्या मिरच्या तोडून टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात उकडलेली भाजी पिळून टाका. मीठ टाकून भाजी परतून घ्या. झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा.

वालाच्या एवजी छोट्या लाल चवळ्या वापरू शकता. 

Thursday, June 13, 2013

Chunda (छुंदा)

छुंदा हे गुजराती पद्धतीचे आंबट-गोड-तिखट असे लोणचे आहे. मेथीचा ठेपला आणि छुंदा म्हणजे अगदी लोकप्रिय नाश्ता .


Read this recipe in English.......click here.


साहित्य:
  • खोबरी कैऱ्या - १ किलो (किसून साधारण २ कप होतात)
  • साखर- अंदाजे ४ कप (जेवढा कीस त्याच्या दुप्पट साखर अस ढोबळ प्रमाण असाल तरी साखर या पेक्षा कमी किंव्हा जास्त लागू शकते. कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे.) 
  • लाल मिरची पूड - ८ टीस्पून
  • जिरे, भाजून खरडलेले - २ टीस्पून
  • मीठ - २ टेबलस्पून 


कृती:
  • कैऱ्या धुऊन, पुसून व साले काढून घ्याव्यात. किसणीवर किसून घ्याव्यात.
  • कीस आणि साखर स्टीलच्या पातेल्यात एकत्र करून स्वच्छ  आणि कोरड्या बरणीत भरावा. (साखर एकदम घालू नये, चव पाहून साखरेचे प्रमाण ठरवावे)
  • बरणीचे तोंड मलमलच्या किंवा पातळ सुती कपड्याने बांधावे. (पातेल्यात ठेवले तरी चालते, हलवायला बरे पडते  पण पालेल्याचे तोंड सुद्धा कपड्याने बांधावे लागेल.)  
  • ही बरणी ८ ते १०  दिवस कडक उन्हात ठेवावी . रोज सकाळी उन्हात ठेवताना चांगले ढवळावे .
  • ८ ते १० दिवसांत साखर विरघळून सुटलेला रस चिकट होईल . त्यामध्ये मिरची पूड, जिरे आणि मीठ मिसळावे  व परत एक दिवस उन्हात ठेवावे. छुंदा तयार .
  • चपाती किंव्हा पराठ्या बरोबर उत्तम लागते . शिवाय उपवासालाही चालतो.


सुचना:
  • कैरीच्या किसाला मीठ चोळून ते पाणी काढून टाकू नये, असे केल्याने छुंदा खूप कोरडा होतो. असे न केल्याने छुंदा शेवटपर्यंत रसरशीत राहतो, म्हणून शेवटीच मीठ टाकावे.
  • मिरची पूड घातल्यावर छुंदा जास्त दिवस उन्हात ठेऊ नये, नाहीतर तो काळा  पडतो .
  • छुंदा एप्रिलच्या मध्यावर करावा, म्हणजे कडक उन्हाने तो लवकर तयार होतो . 

Egg Dosa (अंड्याचे घावन )

हा मसालेदार डोसा/घावन  खूपच रुचकर आणि किस्पी होतो. ह्यात अंड असल्यामुळे यशाची खात्री १०० % अजिबात मोडणार नाही.  


Read this recipe in English.....

साहित्य:

  • अंडी-२
  • तांदुळाचे पीठ- १ कप
  • बारीक चिरलेला कांदा- १/२ कप
  • बारीक चिरलेला टोमाटो - १/४ कप
  • बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप
  • आल-लसुन पेस्ट- १ टीस्पून
  • हिरवी मिरची ठेचा- १ टीस्पून किंव्हा कमी-जास्त तुमच्या आवडीप्रमाणे
  • हळद- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • पाणी- अंदाजे १ कप
  • मीठ आणि मिरपूड -चवीप्रमाणे
  • तेल- आवश्यतेनुसार


कृती:

  • कांदा आणि टोमाटो फूड प्रोसेसर मध्ये फिरवून घेतलत तर छान बारीक होईल आणि मिळून येईल.
  • एका बाउल मध्ये पाणी व तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करा. पाणी लागेल तसे हळूहळू घाला.
  • व्यवस्थित फेटून घ्या. मिश्रण डोश्यासारख सरसरीत झाल पाहिजे. मिश्रण डोश्यापेक्षा थोडं पातळ चालेल. 
  • डोसा तवा गरम करून थोड तेल पसरवा. वाटीत मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओता. जास्त जाडसर करू नका. झाकण ठेऊन १-२ मिनिटे शिजू द्या.
  • उलटून घ्या. छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या .
  • गरमागरम घावणे केचप बरोबर वाढा.
  • चिकन किंव्हा कोलंबीच्या करी सोबत पण छान लागतात .


Monday, June 10, 2013

Homemade Masala/ Kokani Masala (आमचा घरगुती मसाला /कोकणी मसाला)

आज मी तुम्हाला आमच्या घरगुती मसाल्याची पाककृती देत आहे. साधारणपणे कोकणात याच पद्धतीने मसाला बनवला जातो. या मसाल्याचा उल्लेख मी माझ्या अनेक पाककृतीत केला आहे. हा मसाला आम्ही शाकाहारी आणि मांसाहारी अश्या दोन्ही पदार्थात वापरतो. हा जर मसाला वापरला तर इतर दुसरा कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही. पण काहीवेळा मी माझ्या शाकाहारी पदार्थांमध्ये "गोडा मसाला" आणि मांसाहारी पदार्थांमध्ये "गरम मसाला" खास चव येण्यासाठी वापरते.

जानेवारीत नव्या मिरच्या येतात. त्यानंतरच  मसाला करायला घ्यावा. 
आम्ही हा मसाला वर्षभरासाठी करतो. फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये आम्ही मसाला बनवतो.  माझ्या सासूबाई आम्हा सर्वांसाठी हा मसाला गावी बनवतात. गावी असे काम करणाऱ्या खास बायका असतात. त्या मिरची खुडून, साफ करून तसेच भाजून देतात. आमच्याकडे मसाल्याचे जिन्नस भाजण्यासाठी एक मोठी मातीची  कढई (खापर) आहे. नंतर आम्ही गिरणीतून दळून आणतो.

आमचे मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे. त्यामुळे आमचा मसाला त्या पद्धतीचा आहे. हा बराचसा मालवणी मसाल्या सारखाच आहे.
आणि काय असत ..........प्रत्येक कुटुंबाची मसाला करण्याची पध्दत आणि प्रमाण/मापे  वेगळी असते. गावागावाप्रमाणे नाहीतर प्रत्येक कुटुंबाप्रमाणे त्याचे माप बदलते. प्रत्येकाचे असे एक स्वतःचे माप असते. चला तर मग पाहू या आमच्या मसाल्याची "गुप्त" पाककृती.

हे (५ + 3) किलो मसाल्यचे माप आहे. पण तुम्ही थोड्याप्रमाणात घरच्याघरी मिक्सरवर पण करू शकता.



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • संकेश्वरी मिरची- २ किलो
  • घंटूर/ घाटी/मोका/ पाण्डी मिरची- २ किलो
  • बेडगी/ब्याडगी मिरची- १ किलो 
  • धणे- २५० ग्रॅम
  • बडीशेप- ५०० ग्रॅम
  • हळकुंड - २५० ग्रॅम
  • जायपत्री - २०० ग्रॅम 
  • खसखस - २०० ग्रॅम
  • दालचिनी- २०० ग्रॅम
  • चक्री फुल / बाद्यान -  २०० ग्रॅम
  • नागकेशर-  २०० ग्रॅम
  • मोहरी/ राई-  २०० ग्रॅम
  • काळे मिरे- १५० ग्रॅम
  • लवंग- १२० ग्रॅम
  • जिरे- १०० ग्रॅम
  • शहा जिरे - १०० ग्रॅम
  • तमाल पत्र- ५० ग्रॅम
  • हिंग खडे - ५० ग्रॅम
  • दगड फुल- ५० ग्रॅम
  • तिरफळ / त्रिफळ- ५० ग्रॅम
  • मसाला वेलची- २०० ग्रॅम
  • हिरवी वेलची- १० ग्रॅम
  • शेंगदाणा तेल- थोडस जरुरीप्रमाणे (भाजताना कढईला मसाले चिकटू नये व मसाल्याचा रंग आणि वास खुलून यावा म्हणून जरासे तेल वापरायचे. मसाले तेलात तळायचे नाही आहेत.)    

कृती: 
  • कडक उन्हामध्ये मिरच्या ३-४ दिवस वाळवाव्यात. इतर सर्व मसाल्याचे पदार्थ सुद्धा १-२ दिवस उन्हात सुकवावे. (मिरच्या चांगल्या सुकुन कडक व्हायला पाहिजेत. मिरची हाताने तोडल्यास कटकन तुटली पाहिजे. मिरच्या कडकडीत सुकल्या असल्या की मसाला चांगला बारीक कुटला जातो आणि चाळल्यानंतर मागे उरणारा भुसा खुपच कमी निघतो.) 
  • मिरच्यांची देठ खुडा. मिरच्या व सर्व मसाले पाखडून, चाळून, निवडून स्वच्छ करा. काही घाण किंव्हा उपयोगी नसलेल्या गोष्टी काढून टाका. 
  • हळदकुंड, हिंग खडे वेगवेगळे कुटून त्यांचे बारीक तुकडे करुन वेगवेगळे ठेवा.
  • एका कढईत थोड थोड तेल घेऊन त्यात मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या. करपू नका. (मसाल्याचे पदार्थ एकत्र करून भाजायचे नाहीत. प्रत्येक पदार्थाचा भाजण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असतो.)  
  • एका मिरचीचे दोन ते तिन तुकडे करा. काळजीपूर्वक न करपवता मिरच्या भाजा. मिरच्या काळ्या झाल्या तर मसाला पण काळपट होईल. (मिरच्या भाजताना तेलाचा उपयोग करत नाहीत पण मिरच्या सगळ्यात शेवटी भाजतात तेंव्हा तेल चिकटलेले असतेच.  कढईला मिरच्या चीकटण्याची भीती वाटत असेल तर मिरच्या टाकण्यापूर्वी कढईत जरासं तेल शिंपडून घ्या.) 
  • भाजलेले पदार्थ गार करण्यासाठी मोठ्या थाळ्यात किंव्हा पेपरवर पसरून ठेवा.   
  • मिरच्या आणि इतर सर्व साहित्य एकत्र मिसळुन थंड झाल्यावर डंकन/गिरणी/ चक्की मध्ये कुटुन/दळून आणावे. थोड्या प्रमाणात असेल तर मिक्सरमध्ये पण दळता येतो. (डंकनवर कुटले की रंग कायम राहतो आणि जास्त चांगली चव येते. पण चाळून झाल्यावर भुसा जास्त निघतो. चक्कीवर दळले की रंग फिका पडतो.)
  • मसाला कुटून/दळून आणल्यावर चाळा. (काही ठिकाणी गिरणीत चाळण्यासाठी बायका असतात. त्या मसाला चाळुन देतात.) चाळल्यावर मागे उरणारा भुसा/भरड माश्याचे कालवण करताना वाटणात वापरता येतो.     
  • चाळलेला मसाला हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत घालून घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत ठेवा. लागेल तसा थोडा थोडा वापरायला काढावा. किंव्हा आपला रोजच्या वापरातला मसाल्याचा डब्बा ज्या आकाराचा आहे त्या मापाचा मसाला छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत घालून पिशव्या सील कराव्यात. जरुरी प्रमाणे एक-एक पिशवी वापरायला काढावी. मसाला काढताना ओला हात किंव्हा ओला चमचा वापरू नये.  
  • मसाल्याचा डबा नेहमी कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवावा. 
  • मसाल्याचा वास आणि ताजेपणा टिकून राहण्यासाठी त्यात हिंगाचे खडे टाकून ठेवावेत. 




तुम्हाला जर थोड्या प्रमाणात हा मसाला करायचा असेल तर त्याचे हे माप पहा. यात साधारणपणे ८०० ग्रॅम एवढा मसाला तयार होतो. तुम्ही  मिक्सरवर पण दळू शकता.
  • संकेश्वरी मिरची- २०० ग्रॅम 
  • घंटूर/ घाटी/मोका/ पाण्डी मिरची- २०० ग्रॅम 
  • बेडगी मिरची- १०० ग्रॅम 
  • धणे- २५ ग्रॅम
  • बडीशेप- ५० ग्रॅम
  • हळकुंड - २५ ग्रॅम
  • जायपत्री - २० ग्रॅम 
  • खसखस - २० ग्रॅम
  • दालचिनी- २० ग्रॅम
  • चक्री फुल / बाद्यान -  २० ग्रॅम
  • नागकेशर-  २० ग्रॅम
  • मोहरी/ राई-  २० ग्रॅम
  • काळे मिरे- १५ ग्रॅम
  • लवंग- १२ ग्रॅम
  • जिरे- १० ग्रॅम
  • शहा जिरे - १० ग्रॅम
  • तमाल पत्र- ५ ग्रॅम
  • हिंग खडे - ५ ग्रॅम
  • दगड फुल- ५ ग्रॅम
  • तिरफळ / त्रिफळ- ५ ग्रॅम
  • मसाला वेलची- २० ग्रॅम
  • हिरवी वेलची- १ ग्रॅम (२-३ नग)
हे माप कमीत कमी करून दिले आहे. या मापाला गुणून तुम्ही हव्या त्या मापाचा मसाला बनऊ शकता.  

टीप:
मुंबईला खामकर गल्ली (गणेश गल्ली), लालबाग (जिथे 'लालबागचा राजा' बसतो) येथे सर्व मसाल्याचे सामान मिळते. संपूर्ण गल्लीत फक्त मसाल्याचीच दुकाने आहेत. शिवाय तिथे मसाला करून पण मिळतो. सर्व पदार्थ निवडून, भाजून, डंकन मध्ये कुटून त्यानंतर चाळून एकदम तयार मसाला आपल्याला हातात मिळतो. हे २-३ तासाचे काम आहे. आपण फक्त उभ राहून लक्ष ठेवायचे. अर्थात गर्दी असेल तर नंबर लावून ठेवावा लागतो.

      

Thursday, June 6, 2013

Malaysian Spicy Noodles ( मलेशियन स्टाईल स्पायसी नूडल्स )

एकाच प्रकारच्या नूडल्सचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा वेगवेगळे प्रकार करून पाहायला हवेत. चायनीज नूडल्स पेक्षा ह्या जास्त मसालेदार असतात .


Read this recipe in English

साहित्य:

  • उकडलेल्या हक्का नूडल्स - १ पाकीट (२०० ग्रॅम )
  • उकडलेले सोया चंक्स - १  कप
  • तीळाचे तेल किंव्हा आपले वापरते कुठलेही तेल - ४ टेबलस्पून
  • लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरुन -४
  • ओली लाल मिरची, चकत्या करून - २
  • कोबी, जाडसर उभा चिरून - १ कप
  • सिमला मिरची, उभी चिरून, १/२ कप
  • चिली गार्लिक सॉस किंव्हा पेस्ट किंव्हा सांबल - २ ते ३ टेबलस्पून
  • लिंबाचा रस- २ टेबलस्पून
  • सोय सॉस - २ टेबलस्पून
  • स्वीट बीन सॉस - २ टेबलस्पून  किंव्हा गुळाचे पाणी- १ टीस्पून
  • मीठ चवीप्रमाणे


कृती:
एका पँन मध्ये लसुन टाकून परतून घ्या. त्यात सोया चंक्स, कोबी, सिमला मिरची, लाल मिरची आणि मीठ टाकून मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
त्यात उर्वरित सर्व सॉस टाकून परतून घ्या. त्यात नूडल्स टाकून टॉस करा. छान एकत्र करून २-३ मिनिटे परतून घ्या .
लगेचच गरमागरम वाढा आणि गरमागरम खा .

सोया चंक्स एवजी टोफू, मशरूम , चीकन किंव्हा कोळंबी वापरू शकता .


Sunday, June 2, 2013

Rajgeera Ladu/Chikki (राजगिरा लाडू / चिक्की)

उपवासासाठी हा एक लोकप्रिय आणि आरोग्यपूर्ण, कमी उष्मांक असणारा असा हा पर्याय आहे. काही लोक हे लाडू दूधाबरोबर खातात. बाजारात राजगिऱ्याचे लाडू मिळतात, पण घरी केलेल्या लाडवाची लज्जतच न्यारी !



Read this recipe in English......click here.


साहित्य:
  • चिक्कीचा गूळ- १ कप
  • राजगिऱ्याच्या लाह्या - ५ कप
  • साजूक तूप- २ टीस्पून 
  • भाजलेले शेंगदाणे - १/४ कप (एच्छिक)
  • वेलची पूड- १ टीस्पून 

कृती:
  • शेंगदाण्याचे जाडसर तुकडे करून घ्या. कुट करू नका.
  • गूळ आणि तूप एकत्र करून गुळाचा पाक करून घ्या. अधिक माहितीसाठी तीळगुळ ची पाककृती पहा. 
  • पाक झाला की ग्यास बंद करून त्यात लाह्या, शेगदाणे आणि वेलची पूड मिसळा. छान एकत्र करून गरम असतानाच पटापट छोटे छोटे लाडू करा. साधारण तिळगूळापेक्षा थोडे मोठे लाडू बनवा. दुकानाचे लाडू फार मोठे असतात, खायला कंटाळा येतो.
  • किंव्हा.........ताटाला थोडेसे तूप लाऊन त्यात वरील मिश्रण वाटीच्या साह्याने थापा. लगेचच सुरीने वड्या पाडा पण थंड झाल्यावरच त्याचे तुकडे करा. 
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. 

राजगिऱ्याची खीर: राजगिऱ्याचा लाडू वाटीमधे ठेवून त्यावर खूप गरम झालेले दूध हळूहळू ओतावे, त्यामुळे राजगिऱ्याचा लाडू फुटून दुधामधे विरघळतो. ही झाली झटपट राजगिऱ्याची खीर.